वेकोलिशी संलग्न असलेल्या ट्रॅव्हल्स चालकांच्या मागण्यांना घेऊन २८ डिसेंबर पासून काम बंद आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी
कोळसाखाणींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर जाणे येणे करण्याकरिता वेकोलि कडून खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या करिता विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांशी वेकोलिने करार केला आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठीही खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वेकोलिशी अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या संलग्न झाल्या आहेत. वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातील कोळसाखाणींमध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅव्हल्सवर अनेक चालक कार्यरत आहेत. परंतु या चालकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळतांना दिसत नाही. शासनाचे कोणतेही नियम या चालकांना लागू करण्यात आलेले नाही. अगदीच तुटपुंज्या वेतनावर या चालकांना राबवून घेतलं जात आहे. वेकोलीशी संलग्न असलेल्या ट्रॅव्हल्स चालकांना शासनाच्या नियमानुसार वेतन व सुविधा मिळाव्या, याकरिता या आधीही निवेदन देण्यात आले होते. परंतु वेकोलि प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही. आणि म्हणूनच ट्रॅव्हल्स चालकांच्या मागण्यांना घेऊन काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेकोलि प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये एकाच ट्रॅव्हल्स चालकाकडून १६ ते २४ तास ट्रॅव्हल्स चालवून घेऊ नये, शासनाच्या जीआर नुसार वेतन देण्यात यावे, वेतन वेळेवर देण्यात यावे, जेवढे दिवस काम केले तेवढी हाजरी देण्यात यावी, पि.एफ. ची रक्कम योग्यरीत्या कपात करावी, आदी मागण्यांचा समावेश असून या मागण्यांना घेऊन एकता असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ट्रॅव्हल्स चालकांच्या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात येत असून चालकांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे एकता असोसिएशनचे संस्थापक संजय देरकर यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनादरम्यान ज्याही असुविधा निर्माण होईल त्याची संपूर्ण जबाबदारी वेकोलि प्रशासन व ट्रॅव्हल्स मालकांची राहणार असल्याचेही क्षेत्रीय प्रबंधकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी एकता असोशिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ट्रॅव्हल्स चालक उपस्थित होते.
Comments
Post a Comment