ग्रामीण भागातूनही घडले आहेत अनेक प्रतिभाशाली खेळाडू, ग्रामीण भागात प्रिमियर लिग सारख्या स्पर्धा होणं गरजेचं... संजय खाडे
प्रशांत चंदनखेडे वणी
ग्रामीण भागातील तरुणांमध्येही प्रतिभावंत खेळाडू होण्याची क्षमता असून ग्रामीण भागातून अनेक प्रतिभाशाली खेळाडू घडले आहेत. ग्रामीण भागातील तरुण हे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व रांगडे असतात. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातही ते आपली चमक दाखवू लागले आहेत. शेतातील कामातून वेळ मिळाल्यानंतर ते आपला खेळाचा छंद जोपासतात. ग्रामीण तरुणांमध्ये खेळाविषयी असलेलं आकर्षण बघता ग्रामीण भागातही खेळांच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धांचं आयोजन होऊ लागल्याने गाव खेड्यातील खेळाडूंची प्रतिभा समोर येऊ लागले आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण क्षेत्रातही क्रिकेट प्रिमियर लिग सारख्या स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याने ग्रामीण भागातूनही प्रतिभाशाली खेळाडू घडू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी अशा स्पर्धा आयोजित करणं गरजेचं झालं असल्याचे मनोगत श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे यांनी व्यक्त केले. बोरगाव प्रिमियर लिगच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडा मंडळ बोरगाव (मे) द्वारा आयोजित बोरगाव प्रिमियर लिगचा बक्षिस वितरण सोहळा नुकताच पार पडला.
या बक्षिस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महेश सोमलकर, धनंजय खाडे, प्रतिक गेडाम, ईश्वर खाडे, पद्माकर देरकर, सुधाकर तुराणकर, प्रकाश आसुटकर, देविश काळे, आनंदराव बलकी, श्रीकृष्ण महाकुलकर, रंगनाथ कोवे, देवराव कोल्हे, शत्रुघ्न मालेकर, विजय आसुटकर, विठ्ठल चिंचोलकर, निलेश चिंचोलकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय सुरेख असे सूत्र संचालन राहुल घुग्गुल यांनी केले.बोरगाव प्रिमियर लिगमध्ये एकूण ६ संघ सहभागी झाले होते. बजरंग वॉरिअर्स व ११ स्टार संघात अंतिम सामना रंगला. हा सामना अतिशय चुरशीचा झाला. दोनही संघाने शेवट पर्यंत झुंज दिल्याने रोमहर्षक झालेल्या या सामन्यात बजरंग वॉरिअर्सने शेवटच्या षटकात ११ स्टार संघाचा पराभव करीत चषक पटकावला. या स्पर्धेचा विजेता ठरलेल्या बजरंग वॉरिअर्स संघाला ३५ हजार रुपये रोख तर उपविजेता ठरलेल्या ११ स्टार संघाला २५ हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात आला. तसेच प्रिमियर लिग स्पर्धेत उत्तम फलंदाज, उत्तम गोलंदाज, उत्तम क्षेत्र रक्षण व मॅन ऑफ दी सिरीज ठरलेल्या खेळाडूंनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे शिवराम चिडे, उमेश शेंडे, गणेश बलकी, लखन गेडाम, गौरव महाकुलकर, यांच्यासह समस्त बोरगाव वासियांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment