प्रशांत चंदनखेडे वणी
राज्य परिवहन महामंडळाची नागपूर-वणी ही बस बसस्थानकात नेत असतांना रस्त्यावर दुचाकी थांबवून मोबाईलवर वार्तालाप करणाऱ्या दोन तरुणांनी मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगणाऱ्या बस चालकाला स्टेरिंगवरून खाली खेचत मारहाण केल्याची घटना काल ३० डिसेंबरला रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. या टपोरी युवकांनी भाईगिरीचा आव आणीत भर रस्त्यावर हुडदंग घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. युवकांच्या या दबंगगिरीमुळे रस्त्यावरच बस उभी झाल्याने वाहतुकीचा मोठा जाम लागला होता. साई मंदिर पासून तर कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम सुरु असल्याने एकाच बाजूने रहदारी सुरु आहे. त्यातही रस्त्यावर वाहने उभी करून उर्मटपणा दाखविला जात असल्याने वाहतुकीची कोंडी होतांना दिसत आहे. या युवकांनी नसल्या कुरापती करतांना बस रोखून धरली, व चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा जाम लागल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोनही युवकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वणी डेपोची नागपूर-वणी (MH ४० Y ५७२४) ही बस रात्री ८.१५ वाजता वणी येथे पोहोचल्यानंतर बस स्थानकात जात असतांना रस्त्यावर दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या दोन तरुणांनी चालकाशी वाद घातला. हे दोनही तरुण बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मोटारसायकल उभी करून मोबाईलवर गप्पा हाकत होते. बस चालकाने हेड लाईट अप्पर डिप्पर करून व हॉर्न वाजवून त्यांना मोटारसायकल बाजूला घेण्याचे संकेत दिले. परंतु त्यांनी मोटारसायकल बाजूला घेतली नाही. त्यामुळे बस चालकाने त्यांना आवाज देत मोटारसायकल रस्त्यावरून हटविण्यास सांगितले. त्याउपरांतही त्यांनी मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला न घेता भाईगिरीचा आव आणून ते सरळ चालकाच्या अंगावर धावून गेले. बस चालकाला शिवीगाळ करीत त्याला स्टेरिंग वरून खाली खेचले. दोघांनीही त्याला थापड व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे चालकाला शारीरिक दुखापत झाली आहे. याबाबत बस चालक विनोद गोकुलदास सुरपाम (४५) रा. चिखलगाव यांनी दोनही युवकांविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी सुनिल अशोक सोनटक्के (३५) रा. ईसापूर ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर व प्रविण गणपत सोनटक्के (२१) रा. मोहुर्ली ता. वणी या दोनही आरोपींवर भादंविच्या कलम ३५३, ३४१, ३३२ ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

No comments: