Latest News

Latest News
Loading...

बाबासाहेब अमर रहे च्या जय घोषांनी दुमदुमला आसमंत, महापरिनिर्वाण दीना निमित्त महामानवाला शहरवासीयांनी वाहिली आदरांजली

प्रशांत चंदनखेडे वणी 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्याकरीता शहरातील त्यांच्या पुतळ्याजवळ राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच बाबासाहेबांच्या अनुयायांनी एकच गर्दी केली होती. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळ पासूनच त्यांना अभिवादन करण्याकरिता शहरवासीयांची गर्दी उसळली होती. विविध पक्षांच्या नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांना अभिवादन केले. पावसाची रीप रीप सुरु असतांनाही बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता शहरवासी त्यांच्या पुतळ्यजवळ एकत्र आले. शहरातील बहुतांश परिसरातून आज उत्स्फूर्तपणे कँडल मार्च काढण्यात आला. शहरात ठिकठिकाणी त्यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त अभिवादन सोहळे घेण्यात आले. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरिता मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारणाकरिता आपलं अख्ख आयुष्य वेचलं. शोषित पीडित समाजाच्या उत्थानाकरिता त्यांनी संघर्ष उभारला. सामाजिक समानता प्रस्थापित करण्याकरिता त्यांनी लढा दिला. देशात अस्पृश्यता व जातीयवाद त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाळला जायचा. या जातीभेदाच्या झळा बाबासाहेबांनाही सोसाव्या लागल्या. माणसाला माणसाचा विटाळ व्हायचा. त्यामुळे त्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं. परंतु तरीही ते उच्च शिक्षित झाले. तेजस्वी बुद्धीतून त्यांनी पदव्यांचा डोंगर रचला. विद्वतेचा महामेरू ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा अथांग सागर झाले. ज्ञानी पंडित म्हणून ते ओळखले जाऊ लागले. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने त्यांनी समाजातील अज्ञानरुपी अंधार दूर केला. विषमतावादी परिस्थितीवर नंतर त्यांनी कडा प्रहार केला. जातीयता ही मानवतेला लागलेली कीड असल्याचे त्यांनी पटवून दिले. जातीभेदाच्या शृंखला तोडण्यासाठी त्यांनी एकाकी लढा दिला. विषमतावादी शक्तींशी एकटे लढलेले बाबासाहेब खऱ्या अर्थाने महानायक ठरले. समाजात असलेली विषारी विषमता जाळून टाकण्याकरिता त्यांनी जातीय निर्मूलनाची चळवळ उभारली. कित्येक दशकांपासून जातीयतेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यांनी बाहेर काढलं. त्यामुळे ते शोषित पीडित समाजाचे मुक्तिदाते व बहुजनांचे मार्गदर्शक ठरले. गुलामीत जीवन जगणाऱ्या लोकांना समाजात सन्मानाचं स्थान मिळवून देण्याचं महान कार्य त्यांनी केलं. अस्पृश्य म्हणून हिणविणाऱ्या जातीयवादी मानसिकतेला लगाम लावण्याचं काम त्यांनी केलं. शोषित, पंडित व दीनदुबळ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जीवनभर संघर्ष करणारा बहुजनांचा कैवारी ६ डिसेंबरला शांत झोपी गेला, तो कधीही न उठण्यासाठी. ६ डिसेंबर १९५६ रोजी महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. पण त्याचं कार्य व त्यांचे विचार आजही बहुजनांना प्रेरणा देतात. 

त्यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दीना निमित्त शहरवासीयांनी त्यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेब अमर रहे च्या जय घोषांनी आसमंत दुमदुमला होता. शहरातील त्यांच्या पुतळ्यजवळ त्यांना अभिवादन करण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. शहरवासी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरिता त्यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. शहरातही ठिकठिकाणी अभिवादन सोहळे आयोजित करण्यात आले होते. बाबासाहेबांच्या अनुयायांनी उत्स्फूर्तपणे कँडल मार्च काढून त्यांना अभिवादन केले. शहरातील भीम नगर, मनीष नगर, दामले नगर, गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन), सम्राट अशोक नगर, पंचशील नगर येथील अनुयायांनी महामानवाच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त कँडल मार्च काढला. शहरातील विविध प्रभागांमधून निघालेला कँडल मार्च बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर त्याठिकाणी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. बाबासाहेबांना मानवंदना देऊन समाजबांधवांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.