Latest News

Latest News
Loading...

कोळसा वाहतुकीमुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता मनसेचे तीव्र आंदोलन

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिच्या कोळसाखाणींमधून होणाऱ्या कोळशाच्या अवजड वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्ते पूर्णतः उखडले आहेत. धूळ प्रदूषणामुळे तर नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. कोळशाची वाहतूक करणारे शेकडो ट्रक दिवस रात्र सुसाट धावतांना दिसतात. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे कित्येक अपघात घडले आहेत. अपघातात कित्येक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. कोळसा वाहतूक प्रदूषण वाढीलाही कारणीभूत ठरली आहे. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावर धुळीचे साम्रज्य निर्माण झाले असून या धुळीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील येनक, येनाडी, शिवणी, कोलगाव, शेवाळा या गावातील रस्त्यांचं व येथील शेतकऱ्यांच्या शेत पिकांचं कोळसा वाहतुकीमुळे मोठं नुकसान झालं आहे. या गावातून जाणाऱ्या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून गावकऱ्यांचे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अवजड वाहतुकीच्या क्षमतेनुसार रस्त्यांचे बांधकाम करणे गरजेचे असतांनाही संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीने शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार शेत पिकांचे पंचनामेही झाले. परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्याने मनसेने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून आज ७ डिसेंबरला कोळसा वाहतूकीची वाहने रोखून धरण्याकरिता तीव्र आंदोलन उभारले आहे.

कोळसा वाहतुकीमुळे येनक, येनाडी, शिवणी, कोलगाव, शेवाळा या गावांमध्ये अनेक समस्या उद्भवल्या आहेत. मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून धुळीने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धूळ प्रदूषणामुळे गावकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले असून नागरीक बेजार झाले आहेत. वेकोलिच्या कोळसाखाणींमधून होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्याची मागणी येथील नागरिकांनी वेळोवेळी केली. वेकोलि प्रशासन व तालुका प्रशासनाला निवेदनेही दिली. पण शेतकरी व गावकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले. शेवटी कास्तकारांनी मनसेकडे आपल्या व्यथा मांडल्या. वेकोलि कडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठविणाऱ्या फाल्गुन गौरकार यांनी उपविभागीय अधिकारी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा करून संबंधित विभागाशी संपर्क साधला. फाल्गुन गौरकार यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित विभागाने शेतपिकांचे पंचनामे देखील केले. परंतु एक महिना लोटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्याने फाल्गुन गौरकार यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्व कास्तकारांना सोबत घेऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी ७ डिसेंबरला वेकोलिची कोळसा वाहतूक बंद पाडण्याचा ईशारा दिला होता. त्यानुसार वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरण्याकरिता त्यांनी तीव्र आंदोलन उभारले आहे. पाचही गावातील कास्तकार या आंदोलनात सहभागी झाले असून कास्तकारांना नुकसान भरपाई देण्याचे ठोस आश्वासन मिळेपर्यंत या रस्त्यांनी कोळशाची वाहतूक होऊ देणार नसल्याची भूमिका फाल्गुन गौरकार यांनी घेतली आहे. वेकोलिच्या मुजोर प्रशासनाला वठणीवर आण्याकरिता फाल्गुन गौरकार यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या आंदोलनाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.  

No comments:

Powered by Blogger.