Latest News

Latest News
Loading...

शेताच्या बंड्यात ठेवलेल्या कापसावर चोरट्यांनी केला हात साफ, भाव वाढीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याचा २५ क्विंटल कापूस लंपास

प्रशांत चंदनखेडे वणी 

निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी संकटात सापडला असतांना थोड्याफार हातात आलेल्या शेत मालावरही चोरटे डल्ला मारू लागले आहेत. शेतातील बंड्यात साठवून ठेवलेला शेतकऱ्याचा २५ क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ५ डिसेंबरला उघडकीस आली. शेतकऱ्याचा तब्बल १ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा कापूस चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत शेतकऱ्याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील झरपट येथील रहिवाशी असलेल्या प्रविण नारायण महाकुलकार (४१) यांनी राजूर (कॉ.) येथील अशोक दुर्गमवार यांची १७ एकर शेती ठेक्याने केली होती. त्यांनी या शेतात कपाशीची लागवड केली. त्यांना या खरीप हंगामात ५० क्विंटल कापसाचं उत्पन्न झालं. कापसाची वेचणी केल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राच्या शेत शिवारातील बंड्यात कापूस साठवून ठेवला. सुरेश मोखतार सिंह (६५) रा. राजूर (कॉ.) यांचे कळमना येथे शेत असून त्यांच्या शेताला तारेचे कुंपण व शेतात सिमेंट विटांनी बांधकाम केलेला बंडा आहे. प्रविण महाकुलकार यांनी सुरक्षेच्या दृष्टीने मित्राच्या शेतातील बंड्यात कापूस ठेवला होता. कापसाला योग्य भाव मिळाल्यानंतर कापसाची विक्री करायची अशी त्यांची भूमिका होती. पण चोरट्यांनीच डाव साधला. कुंपणाचे तार कापून व बंड्याच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने शेतकऱ्याचा २५ क्विंटल कापूस लंपास केला. ४ तारखेला दुपारी १ वाजता पर्यंत कापूस सुरक्षित होता. पण ५ तारखेला सकाळी ९.१० वाजता कापसाची चोरी झाल्याचे त्यांच्या मित्रांनी त्यांना फोन करून सांगितले. मित्राचा फोन आल्यानंतर लगेच प्रविण महाकुलकार यांनी शेत शिवाराकडे धाव घेतली. त्यांनी बंड्याच्या आत जाऊन पहिले असता त्यांना २५ क्विंटल कापूस चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठून कापूस चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. नापिकीमुळे आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांचे चोरटेही मोठे नुकसान करू लागले आहेत. शेती उपयोगी साहित्यांची मोठ्या प्रमाणात हे चोरटे चोरी करू लागले आहेत. मोटारपंप, झटका मशीन, बॅटरी, स्प्रिंकरचे पितळी नोझल, विद्युत तारा, लोखंडी वस्तू हे चोरटे लंपास करू लागले आहेत. शेतात ठेवलेल्या शेत मालांवरही हे चोरटे आता डल्ला मारू लागले आहेत. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे  झाले असून तशी मागणी देखील कास्तकारांमधून होऊ लागली आहे. 

No comments:

Powered by Blogger.