रस्ते विकासासाठी निधी खेचून आणला, पण दर्जाचं काय, निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधण्यात येत असल्याची होत आहे ओरड
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात सध्या काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम जोरात सुरु आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांपासून तर अंतर्गत व गल्लीबोळातही काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाला वेग आला आहे. सिमेंट रस्ते बांधण्यालाच विकास संबोधण्यात येत आहे. रस्ते बांधकामाकरिता कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याचा गवगवा करून आपली पाठ थोपटून घेतली जात आहे. रस्ते बांधकामावर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून सर्वांचंच चांगभलं होत असल्याने काही भागांत वरचेवर रस्ते बांधले जात आहे. रस्ते बांधकामाच्या निविदा काढण्यापासून तर कंत्राट मिळण्यापर्यंत मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यातून सर्वांचाच हेतू साधला जात आहे. रस्त्यांच्या बांधकामाकरिता निधी मंजूर झाल्यानंतर रस्ते बांधकामाच्या निविदा काढून शासनाच्या निकषांवर कंत्रादाराला रस्ता बांधकामाचे कंत्राट देण्यात येते. परंतु नंतर कंत्राटदाराकडून सर्वांचेच हित साधले जात असल्याने रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेकडे कुणीही लक्ष देतांना दिसत नाही.
मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचे अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही कंत्राटदारावर कुठल्याही प्रकारचे आक्षेप घेण्यात आलेले नाहीत. यावरून सर्वांच्याच डोळ्यावर पट्ट्या व तोंडं बंद केली असल्याचे दिसून येत आहे. जनतेकडून विविध करांच्या माध्यमातून वसूल करण्यात आलेला निधी विकासकामांवर खर्च केला जात असतांना रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे कर्तव्य मात्र कुणीही पार पाडतांना दिसत नाही. त्यामुळे आळी मिळी गुप चिळी ठेऊ आणि सर्वच झोळी भरू अशा प्रकारचा भ्रष्ट एकोपा शहरात नांदत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम करतांना कुठे सळाखीच वापरण्यात आल्या नाही तर कुठे सळाखी बाहेर निघाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. टिळक चौक येथे रस्त्यावर सताड उघड्या पडलेल्या सळाखी अपघाताला आमंत्रण देऊ लागल्या आहे. याकडे जबाबदार अधिकारी मात्र लक्ष द्यायला तयार नाही. भ्रष्ट व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारी अनेक निकृष्ट दर्जाची कामे सामाजिक व राजकीय पुढारी तथा प्रसार माध्यमांनी उघडकीस आणली. परंतु टक्केवारीत वाटेकरी असलेली यंत्रणा मात्र मूग गिळून चूप बसली आहे.
शहर व तालुक्यातील विकासकामांकरिता कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र या निधीतून रस्ते विकासालाच प्राधान्य दिलं जात आहे. शहरात सिमेंट रस्ते बांधकामाचा सध्या सपाटा सुरु आहे. काही ठिकाणी वरचेवर रस्ते बांधले जात आहे. तर काही भागात रस्त्यांची वानवा आहे. शहरातील काही भागात तर २० ते २५ वर्षात काँक्रीट रस्त्याचं बांधकामच झालं नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. आपल्या सोइ नुसार मनमर्जी रस्त्यांवर सिमेंट घोटले जात आहे. लोकप्रतिनिधी नसलेली नगर परिषद रस्ते बांधकामाच्या निविदा काढण्यात गुंतली आहे. मात्र रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचं अधिकाऱ्यांना कुठलंही सौजन्य उरलेलं नाही. नगर पालिकेवर प्रशासकीय राज असल्याने राजेशाही कामे केली जात आहे. लोकप्रतिनिधीविना ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचे चित्र याच देही याच डोळा सर्वांना पहायला मिळत आहे. सभागृहचं बरखास्त झाल्याने ना आढावा बैठक ना विकासकामांबाबत चर्चा, सरळ निविदा काढून कुठलाही करा खर्च अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सिमेंट रस्त्यांच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. भूमिगत नाल्यांचीही कामे हाती घेण्यात आली आहेत. पण या कामांचा दर्जा तपासण्याची जबादारी कुणीही घेतांना दिसत नाही. भूमिगत गटार योजनेची कामे करतांना किती फूट खोदकाम केलं जातं, सिमेंट पाईप कशा पद्धतीने बसविले जातात, नालीचा योग्य उतार काढण्यात आला की नाही, याची खबरदारी घेण्याचं सौजन्यच दाखविलं जात नाही. शहरातील विकासकामे ही लोकप्रतिनिधिंच्या देखरेखीत व्हायची, पण निवडणुकांनाच ब्रेक लावण्यात आल्याने लोकप्रतिनिधी लोप पावले आहेत. त्यामुळे बेछूट कार्यप्रणाली सुरु झाली आहे. शहरात विकासकामांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याची ओरड होत असतांनाही प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सिमेंट रस्त्याचे बांधकाम करतांना वापरण्यात आलेल्या सळाखी किती एमएमच्या आहेत, यावर दृष्टिक्षेप न टाकता अधिकारीवर्ग बिलं पास करण्यात दंग झाला आहे. रस्त्यावरील सळाखी सताड उघड्या पडल्या आहेत. रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पण यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे. रस्ते, नाल्या व इतर बांधकामातून सर्वांचेच खिशे गरम होत असल्याने बांधकामांवर निधी खर्च करण्याला प्राधान्य दिलं जात आहे. मात्र गुणवत्ता तपासण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.
Comments
Post a Comment