पोलिसांसोबत लपंडावाचा खेळ खेळणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या डीबी पथकाने आवळल्या मुसक्या, वर्धा जिल्ह्यातून त्यांना करण्यात आली अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

अनेक गंभीर गुन्हांमध्ये पोलिसांच्या रडारवर असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांचा शोध लावून गुन्हे शोध पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दोन्ही सराईत गुन्हेगारांवर वणीसह जिल्ह्यातील चार पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येणाऱ्या पिंपळखुटा या गावातून डीबी पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. या दोन्ही आरोपींना अटक करून ९ जानेवारीला वणी पोलिस स्टेशन येथे आणून त्यांच्या कडून गुन्हे उघडकीस आणण्यात आले. अनिल विनायक येमूलवार (२२) व दिनेश रविंद्र मेश्राम (२०) दोघेही रा. खडबडा मोहल्ला असे या अटक करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. 

तालुक्यातील भालर वसाहत येथील रहिवासी असलेल्या सुभाष धोंडूजी येवले (५७) यांनी पोलिस स्टेशनला नोंदविलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी भादंविच्या कलम ३९७, ३९४, ३२४, ३४ नुसार गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला. गुन्ह्यातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली. पण अनिल येमूलवार हा पोलिसांना वेळोवेळी चकमा देऊन पसार व्हायचा. पोलिस त्याच्या मागावर होती. पोलिस त्याला अटक करण्याकरिता गेली की, त्याला पोलिसांची भनक लागायची. आणि तो मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावरून पसार व्हायचा. मागील काही दिवसांपासून तो पोलिसांना सारखा गुंगारा देत होता. पण तरीही पोलिस तो लपून बसलेल्या ठिकाणाची माहिती मिळविण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करीत होते. शेवटी ठाणेदार अजित जाधव यांना आरोपी अनिल येमूलवार हा लपून बसलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ डीबी पथकाला वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा या गावाकडे रवाना केले. डीबी पथकाने तेथे जाऊन त्याचा शोध घेतला असता तो खरंगाना पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा गावात आढळून आला. डीबी पथकाने त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या सोबत लपून बसलेल्या आणखी एका अट्टल गुन्हेगाराची माहिती दिली. पोलिसांनी त्यालाही अटक केली. दोनही अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी ९ जानेवारीला वणी पोलिस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडून गुन्ह्यांचा उलगडा केला. तेंव्हा अनिल येमूलवार व दिनेश मेश्राम या दोन्ही सराईत गुन्हेगारांवर वणीसह आणखी चार पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांसमोर आली.  

अनिल येमूलवार व दिनेश मेश्राम या फरार गुन्हेगारांवर वडगांव (जंगल) पोलिस स्टेशनमध्ये कलम ३७९, शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये कलम कलम ३७९, मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये कलम ३७९, राळेगाव पोलिस स्टेशनमध्ये कलम ३७९ तर वणी पोलिस स्टेशनमध्ये कलम ३९७, ३९४, ३२४, ३४ नुसार गुन्हे दाखल आहेत. आरोपी अनिल येमूलवार हा पोलिसांना मागील अनेक दिवसांपासून गुंगारा देत होता. अखेर डीबी पथकाने तो दडून बसलेल्या ठिकाणावरून त्याच्या मुसक्या आवळल्या. एवढेच नाही तर त्याच्या सोबत फरार असलेल्या त्याच्या अन्य साथीदारालाही डीबी पथकाने अटक केली आहे. हे दोघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्या शिरावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, सपोनि माधव शिंदे, सफौ. सुदर्शन वानोळे, पोकॉ. विशाल गेडाम, वासिम शेख यांनी केली. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी