प्रशांत चंदनखेडे वणी
भालर येथील सितानगरी येथे सुरु असलेले कबड्डी सामने बघतांना गावातीलच एका युवकाने शिवीगाळ करून दुसऱ्या युवकाला लोखंडी हातोडीने मारहाण केल्याची घटना ५ जानेवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत मारहाण झालेल्या युवकाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
भालर येथे रहात असलेला राजू प्रभाकर बोबडे (३८) हा सितानगरी येथे सुरु असलेले कबड्डीचे सामने पाहण्याकरिता गेला असता तेथे उपस्थित असलेल्या मंगेशने (१९) त्याला विनाकारण शिवीगाळ करणे सुरु केले. यावरून राजुने मंगेशला शिव्या का देतो, असे विचारले असता मंगेशने त्याच्याशी वाद घालत त्याला हातात असलेल्या लोखंडी हातोडीने मारहाण केली. राजुच्या डोक्यावर हातोडी मारण्यात आल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मंगेश हा दारूच्या नशेत नेहमीच शिवीगाळ करीत असल्याचे राजुचे म्हणणे आहे. मंगेश कडून मारहाण होत असतांना राजुने आरडाओरड केल्याने राजुचे मित्र त्या ठिकाणी धावून आले. त्यामुळे मंगेशने तेथून पळ काढला. राजुने झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी मंगेश विरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

No comments: