सहारा इंडियाने गोरगरीब व कष्टकरी जनतेचा केला विश्वासघात, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास करीत आहे टाळाटाळ
प्रशांत चंदनखेडे वणी
सहारा इंडियामध्ये ग्राहकांनी गुंतविलेल्या पैशाची परतफेड करण्याच्या नावाखाली नुसत्या भूलथापा देण्याचं काम सुरु असल्याने गुंतवणूकदार चांगलेच वेठीस आले आहेत. सहारा इंडियामध्ये वणी उपविभागातील सर्वसामान्य जनतेसह हजारो गुंतवणूकदारांनी पैशाची गुंतवणूक केली आहे. परंतु मागील १० ते १५ वर्षांपासून ग्राहकांना त्यांच्या पैशाची परतफेड करण्यात आलेली नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याचे तथा सेबीने पैशाच्या व्यवहारावर रोख लावली असल्याचे कारण सांगून सहारा इंडिया ग्राहकांच्या पैशाची परतफेड करण्यास टाळाटाळ करीत आहे. मागील अनेक वर्षांपासून सहारा इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून एकच राग आलापला जात आहे. मात्र गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यावर अद्याप कुठलाही सकारात्मक तोडगा निघालेला नाही.
ग्राहक सहारा इंडियाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून वैतागवाणे झाले आहेत. ग्राहकांनी सहारा इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही वेळोवेळी संपर्क साधला. परंतु अधिकारी वर्ग पैशाची परतफेड करण्यासंदर्भात कुठलीही ठोस माहिती देतांना दिसत नाही. सहारा इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांचे केवळ बोळवण केले जात आहे. पैसे कधी परत मिळतील याची त्यांनाच पुरेपूर माहिती नसल्याने ते ग्राहकांचे समाधान करण्यास असमर्थ ठरत आहे. सहारा इंडिया कडून पैशाची परतफेड होत नसल्याने गुंतवणूकदार नैराश्येच्या गर्तेत आले आहेत. त्यांनी भविष्यासाठी केलेली आर्थिक गुंतवणूक त्यांना संकट काळातही उपयोगी पडली नसल्याची खंत गुंतवणूकदारांमधून ऐकायला मिळत आहे. सहारा इंडियाने विश्वासघात केल्याच्या प्रतिक्रिया आता ग्राहकांमधून उमटू लागल्या आहेत.
गुंतवणूकदारांच्या परताव्याची निश्चिती न देता उलट गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सहारा इंडियाकडून केलं जात आहे. पैशाच्या परताव्याची आस लावून बसलेल्या ग्राहकांना सहारा इंडिया कडून चांगलंच तंजवलं जात आहे. ग्राहकांची दिशाभूल करण्याचं काम सहारा इंडिया करू लागली आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळविण्याकरिता नवनवीन युक्त्या सुचविल्या जात आहे. नुकतीच सहारा इंडियाकडून पैशाची परतफेड करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. एका ऑनलाईन पोर्टल वरून गुंतवणूकदारांची व त्यांनी सहारामध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती भरण्यास सांगण्यात आले. सहारातील गुंतवणुकीची ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरल्यानंतर ४५ दिवसांत १० हजार रुपये थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. तसेच ठराविक कालावधीत ग्राहकांना त्यांच्या रक्कमेची पूर्ण परतफेड करण्याचीही खात्री देण्यात आली. त्यामुळे ग्राहकांनी प्रत्येक ठेवीमागे २०० ते ५०० रुपये आर्थिक भुर्दंड सोसून कार्यालयीन व्यवस्थापकांनी सांगितलेल्या ऑनलाईन सेंटर वरून माहिती भरली.
मात्र या पोर्टलवर गुंतवणूकदारांच्या त्रुटीच जास्त काढण्यात आल्या. कुणाचे बँक खाते आधारशी लिंक नाही, कुणाच्या नावात फरक तर कुणाचं ऑनलाईन क्लियरेशन फेल दाखविण्यात आलं. परंतु ज्या ग्राहकांचे कागदपत्र योग्य ठरवून त्यांचे ऑनलाईन अर्ज सबमिट करून घेण्यात आले, त्यांच्या खात्यावरही अद्याप परतफेडीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे श्रमाचा पैसा अडकून बसलेल्या ग्राहकांची सहारा कडून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया गुंतवणूकदारांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. ऑनलाईन परतफेडीची प्रक्रिया राबवून केवळ खिशेभरु काम करण्यात आल्याच्याही चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
आकर्षक व्याजदर व कमी अवधीत रक्कम दुप्पट करण्याचा गाजावाजा करीत सहारा इंडिया ही बँकिंग क्षेत्रात उतरली. वेगवेगळी प्रलोभने दाखवून सहारा इंडियाने ग्राहकांना भुरळ घातली. सहारा इंडिया हा एक मोठा समूह असल्याने गुंतवणूकदार सहारा इंडियामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याकडे आकर्षित झाले. काही जणांनी सहारा इंडियाचे अभिकर्ते असलेल्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी व संबंधितांच्या आग्रहापोटी सहारा इंडियामध्ये आर्थिक गुंतवणूक केली. तर काहींनी सहारा इंडियाची त्यावेळीची आर्थिक उलाढाल पाहून पैसा गुंतविला. सहारा एरलाईन, सहाराचा बीसीसीआयशी असलेला करार, सहाराचे असलेले टीव्ही चॅनल व मोठमोठ्या सहारा सिटीज पाहून सहारा इंडियावर ग्राहकांनी विश्वास दाखविला. आणि सहारा इंडियात गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले. जनतेने सहारामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली. गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेनेही सहारा इंडियावर विश्वास दाखवून आपल्या श्रमाचा पैसा गुंतविला. कुणी मुलाबाळांचे शिक्षण, लग्न व घराचे स्वप्न बाळगून सहारामध्ये गुंतवणूक केली. तर कुणी भविष्याचे आर्थिक नियोजन म्हणून आपल्या घामाचा पैसा सहारामध्ये गुंतविला.
सुकर भविष्य व आपल्या आरोग्याच्या काळजीपोटीही जनतेने सहारामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली. परंतु कोरोना काळात जीवन मरणाच्या वाटेवर असतांनाही सहारा इंडियाने गुंतवणूकदारांना पैशाची परतफेड केली नाही. सहारा इंडियाची गुंतवणूकदार असलेल्या एका महिलेचा पैशा अभावी उपचार न मिळाल्याने कोरोनाने मृत्यू झाला. पण लाख विनवणी करूनही तिला तिचाच पैसा सहारा कडून मिळाला नाही. सहाराने कठीण काळातही गुंतवणूकदारांना सहारा दिला नाही. सहाराने केलेल्या विश्वासघातामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. गरजेसाठी गुंतविलेला पैसा गरजेतही कामी पडला नाही. सहारा इंडिया न्यायालयीन प्रक्रिया व सेबीने आर्थिक व्यवहारावर रोख लावल्याचे कारण सांगून गुंतवणूकदारांच्या पैशांची परतफेड करण्यास टाळाटाळ व चालढकल करीत आहे. मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदार सहारा कडून पैशाच्या परतफेडीची आस लावून बसले आहेत. तेंव्हा जनतेच्या कष्टाचा पैसा त्यांना परत मिळवून देण्याकरिता आता शासनानेच पुढाकार घेण्याची मागणी सर्वसामान्य गुंतवणूकदारांमधून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment