भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जागीच ठार तर पती गंभीर जखमी
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना आज ५ जानेवारीला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ बायपास मार्गावरील वडगाव फाट्याजवळ घडली. छबूताई उत्तमराव भोंगळे (६०) रा. रविनगर असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती उत्तमराव भोंगळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ते दोघेही वरोरा येथे लग्नकार्यात सहभागी होण्याकरिता दुचाकीने जात होते. दरम्यान या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात दुचाकी वरील महिला ट्रकखाली चिरडल्या गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
वणी यवतमाळ बायपास मार्गाने वरोरा येथे लग्न समारंभात सहभागी होण्याकरिता दुचाकीने जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला वडगाव फाट्याजवळ भरधाव ट्रकने (MH ३४ BG ३६४७) मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ते दोघेही रस्त्यावर खाली पडले. यात पत्नी ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा करून अंत झाला. तर पतीला गंभीर दुखापत झाली आहे. शहरातील रविनगर येथे वास्तव्यास असलेले उत्तमराव भोंगळे व त्यांची पत्नी छबूताई भोंगळे दुचाकीने लग्नाला जात असतांना काळ आडवा आला. आणि मार्गात दबा धरून बसलेल्या मृत्यूने आपला डाव साधला. दुचाकीला भीषण अपघात झाला आणि छबूताई भोंगळे यांना नियतीने कायमचे हिरावून घेतले. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रक चालकावर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.
Comments
Post a Comment