नैसर्गिक आपत्तीचे निकष न लावता शेतकऱ्यांना ५० हजार ते १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर


प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिच्या कोळसाखानी व कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाने मानवी आरोग्याबरोबरच शेत पिकंही धोक्यात आली असून रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोळसाखाणींमधून शेकडो ट्रक दिवस रात्र कोळशाची वाहतूक करीत असल्याने रस्त्यावर नेहमी धुळीचं साम्राज्य पसरलेलं असतं. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे उडणारी धूळ शेतपिकांवर साचत असल्याने उभी पिकं उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे कास्तकारांचं अतोनात नुकसान झालं आहे. सतत उडणाऱ्या धुळीचे कण शेतपिकांवर साचून पिकं फळाफुलाला न आल्याने कास्तकारांनी शेतीची मशागत व लागवडीवर केलेला खर्च व्यर्थ गेला आहे. त्यामुळे शेती हेच उत्पन्नाचं साधन असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई मिळण्याकरिता शेतकऱ्यांना घेऊन तीव्र स्वरूपाची आंदोलनं व रस्ता रोकोही करण्यात आला. परिणामी वेकोलिने बाजारभावाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. त्यानुषंगाने कास्तकारांना १ लाख ३६ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असतांना जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नैसर्गिक आपत्ती निकषानुसार १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे. पण धूळ प्रदूषण हे मानव निर्मित असून वेकोलिच्या नियमबाह्य कोळसा वाहतुकीमुळे ते वाढीस लागले आहे. त्यामुळे कास्तकारांना शेतपिकांच्या लागवड खर्चाप्रमाणे नुकसान भरपाई मिळवून देणे शासन व प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. त्याकरिता धूळ प्रदूषणाने शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेकोलि कडून प्रति हेक्टर ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

विजय पिदूरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन नेहमी आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत त्यांनी शासन व प्रशासनाविरुद्ध बंड देखील पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन त्यांनी तीव्र स्वरूपाची आंदोलनं छेडली. शेतकऱ्यांच्या न्याय्य हाकांसाठी त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. वेळ प्रसंगी शासन, प्रशासनाकडे आग्रही भूमिकाही मांडली. सत्ताधारी पक्षाचे नेते असतांनाही त्यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने केली. शेतकरी हितासाठी झटणाऱ्या विजय पिदूरकर यांनी वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या धूळ प्रदूषणाचा मुद्दा उचलून धरला आहे. 

वेकोलिच्या मुंगोली व पैनगंगा कोळसाखाणींतून होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या धूळ प्रदूषणाने साखरा ते शिंदोला मार्गावरील शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मार्गावरील कोलगाव, साखरा, येनक, शिवणी, येनाडी, शेवाळा, शिंदोला, कुर्ली या ८ गावांतील शेतकऱ्यांची शेत पिकं धूळ प्रदूषणाने पूर्णतः उद्धवस्त झाली. तसेच कोळशाच्या धुळीमुळे शेत जमिनीची सुपीकताही घटली आहे. कोळसाखाणींमधून शेकडो ट्रक दिवसरात्र कोळशाची वाहतूक करीत असल्याने रस्त्यावर सतत धूळ उडत असते. ही धूळ शेत पिकांवर साचून शेत पिकांची मोठी हानी होत आहे. धूळ प्रदूषणाने शेतातील पिकं दम तोडू लागली आहे. त्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. धूळ प्रदूषणामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यवरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. वेकोलि नियमांचे सर्रास उल्लंघन करीत कोळशाची वाहतूक करीत आहे. वेकोलिच्या नियमबाह्य पद्धतीमुळे धूळ प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. नियमांना डावलून कोळसा उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वेकोलिने जल, वायू प्रदूषण कायद्याची पायमल्ली केली आहे. 

प्रदूषण वाढीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने ३१ जुलैला प्रदूषण वाढीवर नियंत्रण व शेत पिकांची नुकसान भरपाई मिळण्याकरिता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत वेकोलिने बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. त्यानुसार प्रशासनाच्या आदेशावरून तालुका कृषी विभागाने शेत पिकांचे सर्वेक्षण केले. प्रति हेक्टर १.३६ लक्ष रुपये नुकसान भरपाईचे निरीक्षण नोंदविण्यात आले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नैसर्गिक आपत्ती निकषानुसार १३६०० रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे. परंतु शेत पिकांचे नुकसान नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे. वेकोलिच्या बेजवाबदारपणामुळे धूळ प्रदूषणात वाढ झाली,आणि उभी शेत पिकं नेस्तनाबुत झाली. त्याकरिता शासन, प्रशासनाने वेकोलि कडून ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे आवश्यक असून ही कास्तकारांची रास्त मागणी आहे.  प्रशासनाने शेत पिकांचं झालेलं नुकसान लक्षात घेता त्यांना नुकसानी प्रमाणे भरपाई देण्यास वेकोलिला भाग पाडावे, अन्यथा कास्तकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही , असा इशाराही माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांनी निवेदनातून दिला आहे. वेकोलि प्रशासनाविरुद्ध शेतकरी व गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून शेत पिकांची नुकसान भरपाई व सिमेंट रस्त्याचे बांधकाम न केल्यास ही खदखद आंदोलन रूपात रस्त्यावर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी