शहरात आज सप्त खंजिरी वादक व समाज प्रबोधक सत्यपाल महाराज यांचा भव्य कार्यक्रम
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील जैन ले-आऊट येथील माऊली मंदिर परिसरात आज ९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सप्त खंजिरी वादक व समाज प्रबोधक सत्यपाल महाराज यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त "सत्यपाल महाराजांची सत्यवाणी" हा समाज प्रबोधन घडविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सत्यपाल महाराज हे लहानांपासून तर थोरामोठ्यांपर्यंत परिचित असलेलं नाव आहे. सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम म्हणजे सामाजिक प्रबोधनाची एक पर्वणीच असते. वास्तविकतेला प्राधान्य देणारं त्यांचं प्रबोधन मानवी दृष्टिकोन जोपासण्याची शिकवण देतं. ते आपल्या वाणीतून मानवतादी संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी समाज प्रबोधनाचा विडा उचलला आहे. मागील काही वर्षांत राज्यात अनेक महाराज उदयास आले, पण सत्यपाल महाराजांची सत्यवाणी आजही तेवढ्याच पोटतिडकीने ऐकली जाते. जीवनातील वास्तविकता दर्शविणारं त्यांचं प्रबोधन माणसाच्या मानसिकतेत बदल घडवून आणतं. समाजात मानवी विचारधारा पेरण्याचं काम त्यांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून केलं आहे. मनोरंजनातून प्रबोधन व वास्तविकतेचे धडे देणारा त्यांचा कार्यक्रम बघण्याकरिता आपसूकच पावले कार्यक्रमाच्या दिशेने वळतात.
प्रख्यात समाज प्रबोधनकार म्हणून ख्याती प्राप्त असलेले सत्यपाल महाराज हे समाजाला दिशा दाखविण्याचं काम करतात. खुळचट रूढी, प्रथा, परंपरांवर त्यांनी आपल्या वाणीतून नेहमी प्रहार केला आहे. बुवाबाजीला ते कडाडून विरोध करतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचाही त्यांनी विडा उचलला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांचा ते आपल्या कीर्तनातून खरपुच समाचार घेतात. समाजात अंधश्रद्धा कशी पसरविली जाते, याचे ते प्रात्यक्षिक करून दाखवितात. कर्मकांड व दैववादावर ते आपल्या कार्यक्रमातून निशाणा साधतात. थोर संत, समाज सुधारक व महापुरुषांचे विचार समाजात रुजविण्याचा त्यांनी आपल्या प्रबोधनातून निरंतर प्रयत्न केला आहे. त्यांचा कार्यक्रम कुठेही असो त्यांच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी उसळलेली पहायला मिळते. वृद्धांपासून तर लहान मुलांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या कार्यक्रमाची ओढ लागलेली असते. ज्या गावात एकदा कार्यक्रम घेतला त्या गावात काही वर्ष ते कार्यक्रम घेत नाही, हा त्यांचा पूर्वी पासूनचा नियम. त्यामुळे सत्यपाल महाराजांचा हा कार्यक्रम वणीकरांसाठी प्रबोधनाची एक पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवतील यात जराही शंका नाही.
Comments
Post a Comment