दुचाकी चोरीत मास्टरमाइंड असलेल्या चोरट्याच्या एलसीबी पथकाने आवळल्या मुसक्या, चोरीच्या पाच दुचाक्या केल्या जप्त


प्रशांत चंदनखेडे वणी 

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या जवळून चोरीच्या पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने यवतमाळ शहरासह वेगवेगळ्या गाव शहरातून या पाचही मोटारसायकल चोरी केल्या आहेत. तो दुचाकी चोरट्यांच्या आंतरजिल्हा टोळीचा सदस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ गणेश भाऊराव घोडाम असे या एलसीबी पथकाने अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. त्याने मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीतुनही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला पुढील कार्यवाही करीता मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ कार्यालयात हजर असतांना त्यांना यवतमाळ पांढरकवडा रोडवर असलेल्या किरण पेट्रोलपंप परिसरात एक व्यक्ती त्याच्या जवळील दुचाकी विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची खबऱ्यांकडून माहिती मिळाली. या माहिती वरून एलसीबी पथकाने तात्काळ तो परिसर गाठला. त्या परिसरात सदर इसमाचा शोध घेतला असता तो दुचाकी विक्री करीता ग्राहक शोधतांना संशयास्पद स्थितीत आढळून आला. एलसीबी पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला दुचाकीचे कागदपत्र मागितले असता त्याच्या जवळ कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे पोलिस पथकाला त्याच्या जवळील दुचाकी ही चोरीची असल्याचा संशय आला. एलसीबी पथकाने त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. एलसीबी पथकाने त्याला दुचाकीसह ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने एकच नाही तर पाच दुचाक्या चोरी केल्याची कबुली दिली. त्याने जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरातून व गाव शहरातून या पाचही दुचाक्या चोरी केल्याचे एलसीबीने केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. 

दुचाकी चोरीत मास्टरमाईंड असलेल्या गणेश पांडुरंग कुडमेथे (३५) उर्फ (गणेश भाऊराव घोडाम) रा. इंदिरा आवास घाटी ता. घाटंजी याने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीतूनही मोटारसायकल चोरी केली आहे. त्यामुळे तो दुचाकी चोरट्यांच्या आंतरजिल्हा टोळीचा सदस्य तर नसावा या दिशेनेही पोलिसांकडून तपास केला जात आहे. एलसीबी पथकाने त्याच्या जवळून होंडा ड्रीम युगा MH ३२ AN १३७१, हिरोहोंडा स्प्लेंडर MH २९ X ९८९७, स्प्लेंडर आय स्मार्ट (विना नंबर), हिरोहोंडा स्प्लेंडर प्रो MH २९ AQ ९९५१, हिरोहोंडा पॅशन प्लस MH AY ५२०९ अशा एकूण पाच चोरीच्या दुचाक्या (किंमत १ लाख ७५ हजार रुपये) जप्त केल्या आहेत. या दुचाकी चोरट्याला पुढील कार्यवाही करीता मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्था.गु.शा. चे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतिश फुके तथा सर्व एलसीबी पथकाने केली.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी