संजय खाडे यांनी सुरळीत केला साक्षीचा शैक्षणिक प्रवास, उच्च शिक्षणाकरिता दिलं आर्थिक पाठबळ
प्रशांत चंदनखेडे वणी
श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे हे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. त्यांची दातृत्व भावना सर्वश्रुत आहे. त्यांनी गरजू गरिबांना नेहमी मदतीचा हात दिला आहे. सामाजिक उपक्रमांनाही त्यांनी नेहमी मदत केली आहे. सामाजिक संस्थांना त्यांनी वेळोवेळी देणग्या दिल्या आहेत. मुक्या जनावरांचाही त्यांना कळवळा राहिला आहे. त्यांच्या हातून नेहमीच मदतीचा ओघ वाहिला आहे. सडळ हाताने मदत करणाऱ्या संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजाही भागविल्या आहेत. विद्यार्थ्यांचं शेक्षणिक भवितव्य घडवितांना परिस्थिती अडसर ठरू नये म्हणून त्यांनी गरजवंतांना आर्थिक संयोगही केला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला (इंजिनिअरिंग) प्रवेश मिळालेल्या साक्षी रंगूरवार या विद्यार्थिनीचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणूनही ते मदतीला धावून आले आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थिनीचे शिक्षण थांबले होते. ही बाब त्यांना कळताच त्यांनी लगेच साक्षीच्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाकरिता आर्थिक सहकार्य करून तिच्या शैक्षणिक प्रवासातील आर्थिक अडथळे दूर केले. बुद्धीच्या विकासाकरिता उच्च शिक्षणाची नितांत गरज असून शिक्षणात परिस्थिती आडवी येऊ नये म्हणून त्यांनी साक्षीच्या शिक्षणातील आर्थिक परिस्थितीचा अडथळाच दूर केला.
साक्षी रंगूरवार ही विद्यार्थिनी शहरातील जैताई नगर येथील रहिवासी आहे. साक्षीच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची. आई वडील व मोठा भाऊ असं त्यांचं कुटुंब. आई खानावडीतील जेवणाचे डब्बे पोहचविण्याचे काम करते. तर वडील हमाली काम करून कुटुंबाचा गाडा हाकतात. साक्षी ही अभ्यासू विद्यार्थिनी. शिक्षणात ती अतिशय हुशार. उच्च शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी होण्याचं तिचं स्वप्न. आई वडिलांच्या कष्टाचे फलित करण्याची तिची धडपड. शिक्षणात उंच भरारी घेण्याचे तिचे धेय्य. पण परिस्थितीने तिच्या पंखांना बळच मिळू दिलं नाही. तिचे उंच भरारी घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहतील की काय, ही खंत तिच्या मनात घर करू लागली असतांनाच संजय खाडे नावाचं दानशूर व्यक्तिमत्व मादीला धावून आलं. त्यांनी तिच्या शैक्षणिक प्रवासातील आर्थिक अडथळे दूर करून तिच्या पंखांना बळकटी दिली. त्यांच्या आर्थिक संयोगामुळे साक्षीचा शैक्षणिक प्रवास सुरळीत होणार आहे. संजय खाडे यांनी तिला आर्थिक संयोग केला. तर त्यांच्या अर्धांगिनी व श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्षा संगिता खाडे यांनी साक्षीला पुढील शैक्षणिक वाटचाली करीता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनिल टोंगे, नामदेव जेनेकर, प्रा. धनंजय आंबटकर, प्रा. बाळकृष्ण राजूरकर, गजेंद्र भोयर, नारायण मांडवकर, पांडुरंग पंडिले, अशोक चौधरी, शशिकांत नक्षणे, सुरेश मांडवकर, आदी मान्यवर उपस्थित होते. संजय खाडे यांनी साक्षी रंगूरवार या विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रवासातील अडथळे दूर करून तिच्या शिक्षणाचा मार्ग सुरळीत करून दिल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment