कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाने नैराश्येतून घेतला गळफास
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील शिवणी (जहागीर) या गावातील तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल २० जानेवारीला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. घरी कुणी नसतांना या तरुणाने घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. गुंजन अशोक राजूरकर (२१) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. जिवनात आलेल्या नैराश्येतून युवा पिढी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेऊ लागली आहे. संकटांचा धैर्याने सामना न करता तरुण मृत्यूला कवटाळू लागले आहेत. मानसिक खच्चीकरणातून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून एका पाठोपाठ होत असलेल्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. कुटुंबाचा आधार असलेले तरुण आत्मघात करू लागल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.
शिवणी (जहागीर) येथे परिवारासह वास्तव्यास असलेल्या गुंजन राजूरकर या तरुणाने घरी कुणी नसल्याची संधी साधून घराच्या छताला गळफास लावला. नैराश्येतून त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन आपली जिवन यात्रा संपविली. मृतक हा खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा. त्याचा मोठा भाऊ देखील खाजगी क्षेत्रात कार्यरत असून त्याची आई पीठ गिरणी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. २० जानेवारीला मोठा भाऊ कर्तव्यावर तर आई पीठ गिरणीवर गेली असतांना गुंजनने राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान त्याची आई घरी परतल्यानंतर तिला आपल्या पोटचा गोळा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तिने एकच टाहो फोडला. तिच्या जोरजोराने रडण्याच्या आवाजाने शेजारी त्यांच्या घराकडे धावून आले. समोरील दृश्य पाहून शेजाऱ्यांचेही मन गहिवरले. त्यांच्या डोळ्यातही अश्रू तरंगू लागले. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. गुंजन याच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस त्याच्या आत्महत्या करण्यामागचा कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. गुंजनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment