अवघ्या २४ तासांत सोयाबीन चोरट्यांना ठोकल्या बेड्या, एलसीबी पथकाने केला कौशल्यपूर्ण तपास


प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील वांजरी येथील एका शेतातील बंड्यात साठवून ठेवलेले सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १९ जानेवारीला घडली. या चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अतिशीघ्र छडा लावून अवघ्या २४ तासांत चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. एलसीबी पथकाने त्यांच्या जवळून ६४ हजार ५०० रुपये किंमतीचे १५ क्विंटल सोयाबीन व २ मोटारसायकल असा एकूण १ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही २१ जानेवारीला करण्यात आली. 

मुळचे वांजरी येथील रहिवाशी असलेले व सध्या वणी येथे राहत असलेले विलास दत्तुजी देऊळकर (५०) यांनी कळमना (खुर्द) शेत शिवारातील टिनाच्या बंड्यात सोयाबीन साठवून ठेवले होते. भाव वाढीच्या आशेने त्यांनी सोयाबीनची विक्री केली नव्हती. १९ जानेवारीला ४ वाजता त्यांनी शेतातील बंड्याची पाहणी केली असता त्यांना बंड्यातून १५ क्विंटल सोयाबीन चोरीला गेल्याचे आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी सोयाबीन चोरी केल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी २० जानेवारीला वणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करण्यापर्यंत चोरटे निर्ढावल्याचे पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या चोरी प्रकरणाचा शीघ्र छडा लावण्याची व चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून अवघ्या २४ तासांत चोरट्यांचा शोध लावला. गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नेहमी तत्परता दाखविली आहे. उत्तम नेटवर्क व तपासाची योग्य दिशा हे स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या शोध कार्याचे गमक राहिले आहे. गुन्हेगारांचा शोध लावण्याच्या विशिष्ट शैलीमुळे त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला आहे. विलास देऊळकर यांच्या शेतमालाच्या चोरी प्रकरणाचाही त्यांनी अवघ्या काही तासांतच छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या.

सालगड्यानेच शेतकऱ्याच्या शेतमालाची चोरी केली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यामुळे एलसीबी पथकाने आधी शेत मालकाचा सालगडी असलेल्या अनिल चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करीत त्याला पोपटासारखं बोलतं केलं. त्याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून त्याच्या साथीदारांची नावे वदवून घेतल्यानंतर एलसीबी पथकाने अनिल नामदेव चव्हाण (५०) याच्यासह रोशन तुळशीराम देऊळकर (३०), जयेश शंकर देऊळकर (२०), अतुल उर्फ विवेक अवधूत धवस (२९) सर्व रा. वांजरी या चारही चोरट्यांना अटक केली. त्यांनी चोरी केले सोयाबीन विजय गुलाबराव निते (४८) व चंद्रशेखर पांडुरंग देठे (३९) दोघेही रा. चिखलगाव यांना विक्री केल्याचे तपासातून निष्पन्न झाले. एलसीबी पथकाने या दोन्ही दुकानदारांकडून २९ व १० असे २९ कठ्ठे (१५ क्विंटल) सोयाबीन जप्त केले. एलसीबी पथकाने या कार्यवाहीत १५ क्विंटल सोयाबीन किंमत ६४ हजार ५०० रुपये व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल असा एकूण १ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक  जगताप, स्था.गु.प. चे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, योगेश डगवार, सुधीर पिदूरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, पोहवा नरेश राऊत यांनी केली.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी