प्रशांत चंदनखेडे वणी
गुन्हेगारी क्षेत्रावर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पाटण पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकून कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिस पथकाने २ लाख २५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही १४ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
यवतमाळ गुन्हे शाखेचे पथक वणी येथे अवैध धंद्यांबाबत माहिती गोळा करीत असतांना त्यांना पाटण पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोडपा खिंडी गावालगत असलेल्या जंगल परिसरात मोठा कोंबड बाजार भरवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. एलसीबी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे कुणाला सुगावाही न लागू देता मोठ्या शिताफीने त्याठिकाणी धाड टाकली. तेथे कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळतांना काही इसम पोलिस पथकाला रंगेहात सापडून आले. कोंबडे भांडवून पैशाची हारजीत खेळणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. तसेच चार झुंजीचे कोंबडे व चार लोखंडी कांती पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
एलसीबी पथकाने कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळतांना अटक केलेल्या आरोपींमध्ये गंगाधर अय्या आत्राम (२५)रा. मांडवा ता. झरी, जिवन सुनिल मानकर (२५) रा. कोडपा खिंड, अनिल रामचंद्र पावडे (५६) रा. लहान पांढरकवडा, भिमराव धर्माजी पेंदोर (४४) रा. टेम्बी ता. झरी, शंकर विठ्ठल आकुलवार (३०) रा. मांडवा ता. झरी, शंकर सूर्यभान बोपाटे (४१) रा. मारकी ता. झरी, लक्ष्मण रामा आत्राम (४०) रा. मांडवा ता. झरी यांचा समावेश असून त्यांच्या जवळून पोलिस पथकाने रोख १८ हजार ७८० रुपये, ४ झुंजीचे कोंबडे, चार लोखंडी कांती तथा घटनास्थळावरून ७ वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल असा एकूण २ लाख २५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातही आरोपींवर मजुका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्था.गु.शा. चे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा. सपोनि अतुल मोहनकर, पाटण पोलिस स्टेशनचे सपोनि संदीप पाटील, पोलिस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतिश फुके व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.

No comments: