प्रशांत चंदनखेडे वणी
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण जागीच ठार झाल्याची घटना १३ जानेवारीला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा चौपाटी येथे घडली. एमआयडीसी कडून घरी परततांना लालगुडा चौपाटीवर भरधाव वाहनाने त्याला मागून जोरदार धडक दिली. यात तो ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश ऋषिकेश बोरीकर (३७) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
काही कामानिमित्त एमआयडीसी परिसरात गेलेला हा तरुण काम आटपून आपल्या घरी परतत होता. दरम्यान लालगुडा चौपाटी वरून रस्ता ओलांडताना त्याला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यात तो ट्रकखाली चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मंगेशला ट्रकने धडक देताच आसपासच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु ट्रक चालकाने सुसाट ट्रकसह घटनास्थळावरून पळ काढला होता. ट्रक चालकांच्या भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालविण्याने निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. पायदळ घराकडे जात असलेला मंगेश बोरीकर हा ट्रक चालकाच्या बेजाबदारपणाचा बळी ठरला. वडगाव फाट्याजवळ वृद्ध दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना ताजी असतांनाच भरधाव ट्रकच्या धडकेत हा दुसरा बळी गेला आहे. त्यामुळे मालवाहू वाहनांच्या वेगाला लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहतुकीच्या नियमांचे धडे गिरवले जात असले तरी नियमांचे पालन मात्र होतांना दिसत नाही. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात वाहतूक पोलिसांचे प्रयत्न कमी पडतांना दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून एका वाहतूक पोलिसाने वणी वाहतूक शाखेत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना विश्वासात घेऊन तो शहरातील वाहतुकीतून आपला मार्ग कसा शोधायचा याचं पद्धशीर नियोजन करतो. अनेक वर्षांपासून तो वणी वाहतूक शाखेतच ठिय्या मांडून आहे. वणी शहर व तालुक्यात मालवाहतुकीसह प्रवासी वाहतुकीची वाहनेही मोठ्या प्रमाणात धावतांना दिसतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कर्तव्याची सीमा अफाट आहे. वणी वाहतूक शाखेत आपली वर्णी लावून घेण्यासाठी मोठ्या सेटिंग लावल्या जातात. पोलिस विभागातील बदल्यांच्या या काळात पोलिसांनी आपल्या सोईनुसार वाहतूक शाखेत बदल्या करून घेतल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून एकाच शहरात कर्तव्य बजावून त्यांचे संबंधितांशी मधुर संबंध निर्माण झाले आहेत. तेंव्हा वाहतुकीला शिस्त लावतांना त्यांचे हित संबंध आडवे येतांना दिसत आहे.
एखाद्या कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा कार्यकाळही पूर्ण होण्याआधी त्यांची उचलबांगडी केली जाते. आणि मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांची त्याठिकाणी वर्णी लावली जाते. शहरातील वाहतुकीची स्थिती आज अतिशय बिकट झाली आहे. शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर नेहमी वाहतुकीचा जाम लागताना दिसतो. रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने तासंतास वाहने उभी केली जातात. एवढेच नाही तर पोलिस स्टेशन व तहसील कार्यालयासमोरही आडवी तिडवी वाहने उभी केली जातात. त्यामुळे एसडीओ, तहसीलदार, एसडीपीओ व ठाणेदार यांच्या वाहनांनाही अडथळे निर्माण होत असल्याने त्यांनी कित्येकदा वाहतूक शाखेला ताकीद दिली आहे. परंतु परिस्थिती मात्र जैसे थेच आहे. शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णतः अनियंत्रित झाली आहे. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरूनही सुसाट वाहने चालविली जातात. त्यामुळे या बेछूट वाहतुकीमुळे निष्पाप जिवांचे बळी जाऊ लागले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.

No comments: