दुधाच्या वाहनातून सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या पुष्पांना डिबी पथकाने केली अटक, १४ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनातून चक्क प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्यांचा गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. दूध वितरण करणाऱ्या वाहनात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने सर्वच अवाक झाले आहेत. दूध वितरणाच्या आडून अवैध विक्रेत्यांना सुगंधित तंबूखाचा पुरवठा करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह डीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. ही धडक कार्यवाही ११ फेब्रुवारीला करण्यात आली. या कार्यवाहीत डीबी पथकाने १४ लाख ८६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

वणी येथे दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आणला जात असल्याची गोपनीय व तितकीच खात्रीदायक माहिती ठाणेदार अनिल बेहरानी यांना मिळाली. त्यांनी लगेच डीबी पथकाला अलर्ट करून मिळालेल्या माहितीच्या आधारे दूध वितरण करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यास सांगितले. ठाणेदारांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख माधव शिंदे यांनी अगदी सकाळीच शोध मोहीम राबवून दूध वितरण करणाऱ्या वाहनांची झडती घेणे सुरु केले. अशातच शहरातील गाडगेबाबा चौक येथिल निकिता एजन्सीज जवळ उभ्या असलेल्या दूध वितरणाच्या वाहनाची झडती घेतली असता वाहनात ८५ प्लास्टिकचे खाली ट्रे आढळून आले. पोलिसांनी वाहनाची बारकाईने तपासणी केल्यानंतर दुधाच्या खाली ट्रे च्या मागे पांढऱ्या रंगाचे पोते आढळून आले. त्या पोत्यांबाबत वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने त्या सर्व १३ पोत्यांमध्ये सुगंधित तंबाखूचे डब्बे असल्याचे सांगितले. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी जी.पी. दंदे यांना पाचारण करून त्यांच्या समक्ष त्या सर्वच पोत्यातील सुगंधित तंबाखूचा साठा तपासाला असता त्यात सुगंधित तंबाखूचे २०० ग्राम वजनाचे ५२० डब्बे आढळून आले. डीबी पथकाने ४ लाख ८६ हजार २०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व टाटा ४०७ वाहन (MH 31 CQ 8815) असा एकूण १४ लाख ८६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच वाहन चालक सागर प्रकाश चौधरी (२६) रा. कोहमारा, ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया, ह.मु. खरबी चौक जयश्रीराम नगर नागपूर व क्लिनर प्रणय राजेश सावरकर (४१) रा. सद्भावना नगर नागपूर या दोन आरोपींना अटक केली. हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा ते कुठल्या अवैध व्यावसायिकाला देणार होते, याबाबत पोलिसांकडून दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दोनही आरोपींवर भादंवि च्या कलम १८८, २७२, २७३, ३२८, ३४ व अन्न सुरक्षा अधिनियम २००६, नियम व नियमने २०११ चे कलम ५९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

दूध वितरणाच्या वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची खेप घेऊन येणाऱ्या आरोपींच्या डीबी पथकाने मुसक्या आवळल्या. परंतु सुगंधित तंबाखूची तस्करी करण्याकरिता त्यांनी लढवलेली शक्कल सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली. दुधाच्या वाहनातून अवैधरित्या सुगंधित तंबाखूचा साठा घेऊन येणाऱ्या आरोपींनी पुष्पा चित्रपटातील पुष्पाचं अनुकरण केल्याचे दिसते. तस्करीतून झटपट मालामाल होण्याच्या मोहात अनेक पुष्पा तस्करीच्या या काळ्या धंद्यात उतरले आहेत. शासनाने प्रबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची शहरात मोठी मागणी आहे. अवैध विक्रेत्यांकडून मिळेल त्या किमतीत सुगंधित तंबाखू खरेदी करण्याचा पान टपरी धारक प्रयत्न करतात. शहरात प्रत्येक पान टपरीवर खुलेआम व सर्रास खर्रा विक्री सुरु आहे. सुगंधित तंबाखूविना खर्रा तयार होत नाही, याची सर्वांनाच कल्पना आहे. प्रशासकीय विभागातीलही अनेक जण सुगंधित तंबाखूत घोटलेल्या सुपारीचे तलबी आहेत. याला संबंधित विभागही अपवाद नाही. शहरात सर्रास खर्रा विक्री सुरु असतांना त्यांना सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणारे पुष्पा तयार होतच राहतील. सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर शहरात अनेकदा कारवाया झाल्या. सुगंधित तंबाखूचे मोठमोठे साठेही जप्त करण्यात आले. परंतु त्यामुळे केवळ खर्ऱ्याचे भाव वाढले. खर्रा विक्री मात्र बंद झाली नाही. कारण सामान्य वर्गच नाही तर प्रशासकीय विभागातील कर्मचारीही चवीने खर्रा चघळतात. भाऊ खर्रा आहे काय किंवा थोडा खर्रा दे यार, असे म्हणणारे प्रत्येकचं विभागात पहायला मिळतात. त्यामुळे शहरात सुगंधित तांबाखू युक्त पदार्थांची विक्री बंद होणं गरजेचं असल्याच्या प्रतिक्रिया यावरून व्यक्त होतांना दिसत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी