वेकोलि अधिकाऱ्यांना धारेवर धरू म्हणणारे लोकप्रतिनिधी अद्यापही गप्पच आणि आंदोलने मात्र सुरूच

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे वणी-उकनी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वेकोलि कडून रस्ता बांधकामाचा मुहूर्त निघता निघत नसल्याने ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य व गावकऱ्यांनी आज १० फेब्रुवारीला वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरली. वेकोलिचे अधिकारी निव्वळ रस्ता बांधकामाचे आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याने गावकरी कमालीचे संतप्त झाले आहेत. २ डिसेंबरला रस्त्याचे बांधकाम सुरु करण्याचे वेकोलि कडून लिखित आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. रस्त्याचे बांधकाम करण्यास वेकोलि कडून चालढकल करण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज वेकोलिची कोळसा वाहतूकच रोखून धरली. जोपर्यंत रस्ताच्या बांधकामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत कोळशाची वाहतूक होऊ देणार नसल्याचा पवित्रा ब्राह्मणी गाववासीयांनी घेतल्याने चर्चेकरिता आलेल्या वेकोलि अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वेकोलि अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण चर्चेतून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. वेकोलि अधिकाऱ्यांनी पोकळ आश्वासन न देता रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करावी, ही  भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने अधिकाऱ्यांना निराश होऊन परतावे लागले. त्यामुळे कोळशाची वाहतूक अजूनही ठप्प पडली आहे. कोळसा वाहतुकीच्या वाहनांनी होणारा हजारो टन कोळशाचा पुरवठा थांबल्याने वेकोलिचे मोठे आर्थिक नुकसान आहे. 

वेकोलि कडून खानबाधित क्षेत्रात सोइ सुविधा पुरवितांना दिरंगाई केली जात आहे. वेकोलिच्या दुर्लक्षितपणामुळे खानबाधित क्षेत्रात समस्यांचा डोंगर वाढला आहे. खानबाधित क्षेत्रातील समस्या सोडविण्यास वेकोलि उदासीनता दर्शवित आहे. कोळसाखाणींनी वेढलेल्या परिसरात वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. धूळ प्रदूषणाने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. शक्तिशाली ब्लास्टिंगमुळे घराला तडे जाऊ लागले आहेत. नद्या नाल्यांचे पाणी प्रदूषित होऊ लागले आहे. अपघातांच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. धूळ प्रदूषणाने कास्तकारांचेही अतोनात नुकसान होऊ लागले आहे. कोळसा वाहतुकीच्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. रस्त्यांनी अहोरात्र कोळशाची वाहतूक सुरु असते. त्यामुळे रस्ते क्षतिग्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्यांनी वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. कोळसाखाणींकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, ही मागणी सातत्याने होत असतांना वेकोलि कडून वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देतांना दिसत नाही. रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याचा गवगवा केला जातो. पण ग्रामीण भागात व खानबाधित क्षेत्रात रस्त्यांची वानवा दिसून येते. आमचे सरकार येऊ द्या, वेकोलिच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरू म्हणणारे आता मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रदूषण व रस्त्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही भागात वरचेवर रस्ते बांधले जात आहे. तर भागातील जनता रस्ते निर्माणाची चातकासारखी वाट पाहत आहे. लोकप्रतिनिधीच्या दुटप्पी धोरणामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. केवळ टक्केवारी साधण्यावर लोकप्रतिनिधीचा भर दिसून येत आहे. कंत्राटदारांना खुश ठेवण्याकरिता व त्यातून आपले हित साधण्याकरिता अनावश्यक ठिकाणी निधी उधळला जात असल्याच्या खुल्या चर्चा आता ऐकायला मिळत आहे. विकासकामांकरिता आलेल्या निधीतून शब्द फुटणार नाही एवढा स्वतःचा विकास साधण्यात आला आहे. विकास होत असल्याचे भासविले जात असले तरी कळीचे मुद्दे जैसे थे च आहेत.

वणी-उकनी मार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. अनेकदा रस्ता रोकोही करण्यात आला. वेकोलिने प्रत्येक वेळी गावकऱ्यांना रस्ता बांधकामाचे आश्वासन देऊन त्यांचे बोळवण केले. गावकऱ्यांना पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली. या मार्गाने मार्गक्रमण करणे कठीण झाले असतांनाही वेकोलि रस्त्याचे बांधकाम करण्यास चालढकल करीत असल्याने गावकरी कमालीचे सांतापले. मागील आंदोलनावेळी वेकोलिने २ डिसेंबर पासून रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु वेकोलिने दिलेला शब्द पाळला नाही. वेकोलि अधिकाऱ्यांनी आपल्या वृत्तीचा परत एकदा परिचय दिल्याने गावकऱ्यांना त्यांचे घुमाऊ डाव कळून चुकले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी वेकोलिची कोळसा वाहतूकच रोखून धरली. कोळसा वाहतूक रोखून धरताच वेकोलि अधिकारी खडबडून जागे झाले. पण आता कोणत्या तोंडाने गावकऱ्यांपुढे जावे हा त्यांच्या पुढे पेच निर्माण झाला. तरीही अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांपुढे आपल्या आश्वासनांचा पिटारा खोलण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी गावकरी चांगलेच भडकले. रस्त्याचे बांधकाम सुरु होत नाही तोवर कोळशाचे ट्रक चालू देणार नाही, असा पवित्राच गावकऱ्यांनी घेतल्याने वेकोलि अधिकाऱ्यांना हात लावत माघारी परतावे लागले. त्यामुळे वणी उकनी या मार्गावरील कोळशाची वाहतूक अजूनही ठप्प पडली आहे. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी