वणी ते (जुनाड मार्गे) भद्रावती मार्गाचे तात्काळ बांधकाम सुरु करा, संजय खाडे यांची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी वरून भद्रावतीचे अंतर कमी व्हावे तथा या मार्गाने सहज व सोपा प्रवास करता यावा म्हणून जुनाड गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीवर मोठा पूल बांधण्यात आला. वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु हा मार्गच अद्याप तयार करण्यात न आल्याने हा पूल केवळ शोभेची वस्तू बनला आहे. वणी वरून जुनाड मार्गे भद्रावातीला जाण्याकरिता रस्ताच बांधण्यात न आल्याने या मार्गाने अद्यापही वाहतूक सुरु झालेली नाही. त्यामुळे भद्रावतीला प्रवास करतांना अजूनही २० ते २५ किमीचा अतिरिक्त फेरा होत आहे. जुनाड लगत वर्धा नदीवर पूल बांधण्याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. पण प्रवाशांना या मार्गाचा अद्यापही लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे या मार्गाचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून प्रवाशांना प्रवासाकरिता हा मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उकनीचे माजी सरपंच संजय खाडे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

वणी वरून भद्रावतीला जाण्याकरिता सरळ मार्ग नाही. भद्रावतीला जाण्याकरिता २० ते २५ किमीचा फेरा करावा लागतो. त्यामुळे भद्रावतीच्या प्रवासाचे अंतर कमी व्हावे याकरिता जुनाड मार्गाचा पर्याय निवडण्यात आला. त्याकरिता जुनाड गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीवर मोठा पूल बांधण्यात आला. या पुलाचे बांधकाम करतांना कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. वर्धा नदीवर पूल बांधण्यात आल्याने भद्रावतीचा प्रवास सुलभ होईल, अशी वणीकरांना अपेक्षा होती. पण तीन वर्ष लोटूनही हा मार्गच तयार करण्यात न आल्याने त्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. रस्ते विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी वणी विधानसभा क्षेत्रासाठी मिळाला आहे. परंतु आवश्यक असलेल्या ठिकाणी अद्यापही रस्त्यांचे बांधकाम करण्यात न आल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वणी ते भद्रावतीचे अंतर २० ते २५ किमीने कमी करणारा हा मार्ग पुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप सुरु न झाल्याने भद्रावतीच्या प्रवासाकरिता प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. हा मार्ग तयार करण्याकरिता जमिन संपादन करण्याची प्रक्रियाही अगदीच कासव गतीने सुरु आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वणी वरून (निळापूर, ब्राह्मणी, बोरगाव, जुनाड, तेलवासा मार्गे) थेट भद्रावतीला जाता यावे याकरिता वर्धा नदीवर मोठा पूल बांधण्यात आला. पण पुलाला जोडणारा रस्ता मात्र अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे या रस्ता बांधकामाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून या मार्गाचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी उकनीचे माजी सरपंच संजय खाडे यांनी एसडीओ मार्फत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना संजय खाडे यांच्या सोबत पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, जयसिंग गोहोकर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, प्रा. शंकर वऱ्हाटे, महेश पावडे, तेजराज बोढे, बंडू मालेकर आदी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी