Latest News

Latest News
Loading...

सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी तत्कालीन ठाणेदाराची मानव अधिकार आयोगाकडे केली तक्रार

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी परिचारिकेने हेतुपुरस्सरपणे केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी थेट पोलिसांच्या विरोधात मुंबई मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. वणी पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार यांनी रविंद्र कांबळे यांची कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा शहनिशा न करता सरळ गुन्हे दाखल केल्याने त्यांनी राज्य मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. या परिचारिकेने या आधीही रवींद्र कांबळे यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली होती. परंतु तिने स्वतःहूनच ती तक्रार वापस घेतली. आता परत तिने कुणाच्यातरी सांगण्यावरून रविंद्र कांबळे यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार केली असून तिचा करविता धनी कुणी तरी वेगळाच असल्याचे रविंद्र कांबळे यांचे म्हणणे आहे. परंतु तत्कालीन ठाणेदारांनी परिचारिकेच्या तक्रारी वरून कुठलीही शहनिशा न करता गुन्हे दाखल केल्याने रविंद्र कांबळे यांनी याविरुद्ध मानव अधिकार आयोगाकडे दाद मागितली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील असुविधेबाबत व अधिकाऱ्यांच्या बेजवाबदार कामांबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. त्याचा वचपा काढण्याच्या दृष्टीने येथील परिचारिका कर्मचारी जयश्री इंगोले व ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रवींद्र कांबळे यांच्या विरुद्ध असंवैधानिक भाषेचा वापर केल्याची १७ मार्च २०२१ रोजी वणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली होती. परंतु नंतर त्यांनी दिलेली तक्रार वापसही घेतली होती. त्यानंतर तक्रार प्रत वरिष्ठांकडे दिली. त्यामुळे रविंद्र कांबळे यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र रविंद्र कांबळे यांनी जयश्री इंगोले यांच्यासह डॉ. कमलाकर पोहे, सतीश जोगी व डॉ. सुलभेवार यांच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हे दाखल करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी जयश्री इंगोले ही देखील एक आहे.

या परिचारिकेने १७ मार्च २०२१ रोजी मागे घेतलेल्या तक्रारीचा संदर्भ देऊन परत २९ नोव्हेंबर २०२३ रोजी रवींद्र कांबळे यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. आश्चर्याची बाब म्हणजे तत्कालीन ठाणेदारांनी रविंद कांबळे यांची चौकशी न करताच सरळ त्यांच्यावर गुन्हे दखल केले. १७ मार्च २०२१ रोजी जयश्री इंगोले व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी रविंद्र कांबळे यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी वरून पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. तसेच तक्रारदाराने स्वतः पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार वापस घेल्याचीही पोलिस स्टेशनला नोंद आहे. याची मात्र तत्कालीन ठाणेदाराने दखल घेतली नसल्याचे रविंद्र कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. रविंद्र कांबळे यांची जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावरून सामाजिक कार्यकर्ता या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी उपअधीक्षक यांच्या पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याने करावी असे शासन निर्णयात नमूद असतांना देखिल त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. तेंव्हा माझी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने माझ्या स्वतंत्रतेचे हनन झाले असून माझी राजकीय व सामाजिक क्षेत्रात नाहक बदनामी झाली असल्याची तक्रार रविंद्र कांबळे यांनी मानव अधिकार आयोग मुंबई यांच्याकडे केली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची सूचना न देता गुन्हे दाखल करणाऱ्या तत्कालीन ठाणेदार यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी देखिल रविंद्र कांबळे यांनी केली आहे. 

  

No comments:

Powered by Blogger.