Latest News

Latest News
Loading...

महसूल विभागाच्या मूक संमतीने सुरु असलेला रेतीचा काळाबाजार बंद करावा, ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोशियेशनची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

महसूल विभागाच्या मूक संमतीने वणी तालुक्यात व तालुक्याबाहेर राजरोसपणे सुरु असलेल्या वाळू तस्करीला कायमस्वरूपी पायबंद घालण्याची मागणी वणी ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोशियेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांनाही निवेदने देण्यात आली आहे.  

वणी तालुक्यात वाळू तस्करीला अक्षरशः उधाण आले आहे. वाळू तस्कर प्रशासकीय अधिकाऱ्यांना न जुमानता वाळू तस्करीचा गोरख धंदा करीत आहेत. तालुक्यात राजरोसपणे वाळू तस्करी सुरु आहे. रेतीची चोरी करून ती शहरात व शहराबाहेर सर्रास विकली जात आहे. दिवसाढवळ्या विना परवाना रेतीची वाहतूक केली जात असून दाम दुप्पट किंमतीने ती विकली जात आहे. आणि प्रशासन केवळ मूक दर्शक बनले आहे. प्रशासनाच्या मूक संमतीनेच रेतीचा काळाबाजार सुरु असल्याची शंका येत आहे. गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन करून विना परवाना खनिजाची वाहतूक सुरु असतांनाही प्रशासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यास धजावत नाही. शहरात व शहराबाहेर अवैधरित्या रेतीचे साठे करण्यात आलेले असतांनाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी साधी चौकशी करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांनी रेती भरलेले ट्रक दृष्टीस पडत असतांनाही प्रशासकीय अधिकारी त्याकडे कानाडोळा करतात. अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करण्यास प्रशासकीय अधिकारी जागचे हलत नाही. त्यामुळे वणी महसूल विभागात नियुक्ती मिळविणारे अधिकारी केवळ माया गोळा करण्याचेच काम करतात की काय असे वाटायला लागले आहे.

शासनाने रेती विक्रीची ऑनलाईन पद्धत सुरु केली आहे. त्यानुसार वणी तालुक्यातील रांगणा, भुरकी व शेलू या रेती घाटावरून रेतीचा उपसा व ऑनलाईन पद्धतीने रेती विक्री करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या तीनही रेती घाटातील रेती साठविण्याकरिता एक डेपो उभारण्यात आला आहे. रेती घाटातून रेतीचा उपसा, रेतीची वाहतूक व साठवणूक तसेच ऑनलाईन पद्धतीने रेतीची मागणी करणाऱ्याला रेती पोहचविण्यापर्यंतचे कंत्राट देण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या होत्या. काहींनी रुपयाच्या नाही तर पैशाच्या दरात निविदा भरल्या. त्यामुळे अतिशय कमी दरात हे कंत्राट देण्यात आले. यावरूनच कंत्राटदार किती प्रामाणिक काम करू शकतो याची प्रचिती येते. ऑनलाईन रेतीची मागणी करणाऱ्याला निकृष्ठ दर्जाची रेती पुरविली जात आहे. त्यामुळे ऑनलाइनचा निव्वळ खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. उत्तम दर्जाची रेती चोरट्या मार्गाने विकली जात असल्याने रेती डेपो हे रेती तस्करीचा अड्डा बनल्याचे दिसत आहे. वणी तालुक्यातून यवतमाळ येथे रेतीची तस्करी सुरु असून लगतच्या जिल्ह्यातही चोरट्या मार्गाने रेती विकली जात आहे. येथे वाळू माफियांचे रात्रीचे खेळ सुरु असतांना प्रशासकीय अधिकारी मात्र मुकदर्शक बनले आहेत. घरकुलधारकांना मोफत रेती देण्याचे ठरले होते. परंतु घरकुलधारकांचीही मोठी पिळवणूक केली जात आहे. त्यांना रेतीसाठी चांगलेच तंजवले जात आहे. त्यांना माती मिश्रित रेती पुरविली जात आहे. त्यामुळे शासनाचा हा ऑनलाईन प्रयोग तस्करांना जगविणारा ठरत आहे. 

रात्री रेती घाटावरून रेती भरलेले ट्रक निघतात. अधिकारीवर्गही त्यांच्या दिमतीला असतो. ऑनलाईन पद्धतीमुळे रेती चोरीला सुरक्षेचे कवच मिळाले आहे. डेपोमध्ये रेतीची साठवणूक करण्याचे कारण सांगून बिनधोक रेतीचा उपसा केला जातो. आणि ऑनलाईन रेती ऑर्डरच्या दोन वाहनांसोबत अवैध रेती वाहतुकीची चार वाहने पाठविली जातात. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. विविध शकली लढवून व चलाखी करून तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्करांनी अनेक वर्षांपासून रेती तस्करीचा गोरखधंदा चालविला आहे. यात मात्र इमानदार ट्रॅक्टर मालक व मजुरांचं मरण होत आहे. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. रेती तस्करांनी आपला दबदबा तयार केल्याने सामान्य ट्रॅक्टर मालक, चालक व मजूर देशोधडीला आले आहेत. त्यामुळे वणी तालुक्यात सुरु असलेल्या या रेती तस्करीला कायमस्वरूपी लगाम लावण्यात यावा, अन्यथा प्रामाणिक जीवन जगणारा हा वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. येत्या दहा दिवसांत वाळू तस्करी बंद न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोशियेशनच्या वतीने महसूलमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर असोशियेशनचे अध्यक्ष धर्मेंद्र काकडे, उपाध्यक्ष सुमित ठेंगणे, प्रेमानंद धानोरकर, प्रमोद ताजने, प्रमोद बोबडे, शिवशंकर लाटकर, बंडू निंदेकर, राजू चिडे, प्रमोद मिलमिले, गणेश बदखल, मनोज मिलमिले, जगदीश वाघाडे, हरीश मोहबिया, अतुल हिवरकर, नितीन आवारी, अमोल लांबट, अतुल बोबडे, समीर अहेमद, संतोष मोहितकार, पंकज मोरे, धीरज पारोधी, राकेश खापणे, विशाल रोगे, युवराज ठाकरे, अनिल सोनटक्के, विलास मुडे, योगेश बदखल, सुनिल येमूलवार, संजय गाडलेवारसतिश तुराणकर, प्रभाकर डाहुले, महेश गेडाम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

No comments:

Powered by Blogger.