प्रशांत चंदनखेडे वणी
वळण रस्त्यावरून अचानक वळलेल्या दुचाकीला मुख्य मार्गाने येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भिषण अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना आज ६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील कळमना वळण रस्त्याजवळ घडली. या अपघातात दोनही दुचाकी चालक जखमी झाले आहेत. दुचाकी चालकाने हेल्मेट घातले असल्याने त्याच्यावरील प्रसंग टळल्याचे सांगण्यात येत आहे. सुनंदा उत्तम रामटेके (५२) रा. राजुरा जि. चंद्रपूर असे या अपघातात दुर्दवी मृत्य झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गौरव उत्तम रामटेके (२७ रा. राजुरा व किशोर सुरेश गेडाम (३४) रा. धोपटाळा ता. वणी हे दोनही दुचाकी चालक जखमी झाले आहेत.
राजुरा येथे वास्तव्यास असलेले मायलेक दुचाकीने आपल्या गावी परतत असतांना हा अपघात झाला. पांढरकवडा येथे रहात असलेल्या आपल्या मुलीकडे मुक्काम करून आई आपल्या मुलाबरोबर दुचाकीने (MH ३४ BQ ३६०९) राजुऱ्याला जात होती. दरम्यान कळमना वळण रस्त्यावरून अचानक वणी यवतमाळ मार्गावर वळण घेतलेल्या दुचाकीला (MH २९ BZ ३८०५) त्यांची दुचाकी धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला खाली रोडवर पडल्याने तिला गंभीर दुखापत होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अति वेग आणि बेजाबदारपणे घेतलेले वळण यामुळे घडलेल्या या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. मागील काही दिवसांत अपघाताचे प्रमाण बरेच वाढले आहे. अपघातात निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहे. परंतु वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता व अपघात रोखण्याकरिता वाहतूक विभागाकडून कुठलेही प्रयत्न होतांना दिसत नाही.
पांढरकवडा येथे राहणाऱ्या मुलीची भेट घेऊन गावाकडे परतणाऱ्या मायलेकाच्या दुचाकीला अचानक अपघात झाला आणि आई व मुलाची कायमची ताटातूट झाली. मुलासोबत दुचाकीने गावाकडे जात असलेली आई क्षणात गतप्राण झाली. मुलासोबत आनंदात गावाकडे जात असलेल्या आईवर काळाने झडप घातली. नियतीने डाव साधला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मृतक महिलेचा मुलगा हा वेकोलिच्या सास्ती (गोवारी) कोळसाखाणीत मायनिंग सरदार या पदावर कार्यरत आहे. त्याची उद्या विभागनिहाय परीक्षा असल्याने तो गावाकडे परतत होता. परंतु दरम्यान हा अनर्थ घडला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघातग्रस्त दोन्ही दुचाक्या ताब्यात घेऊन पोलिसांनी त्या पोलिस स्टेशनला लावल्या आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे.

No comments: