प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वागदरा ग्रामपंचायतीने गावात केलेल्या विकासकामांची आता पोलखोल होऊ लागली आहे. निकृष्ठ दर्जाची कामे करून विकासकामांच्या नावावर निव्वळ निधी उधळण्यात आल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. भूमिगत नालीचे बांधकाम करतांना बेजाबदारपणाचा कळस गाठण्यात आला आहे. भूमिगत नालीचे बांधकाम करतांना खोदकाम केल्यानंतर खाली बेड काँक्रीट न टाकता सरळ सिमेंट पाईप बसविण्यात आले. त्यातही संताप वाढविणारी बाब म्हणजे दोन सिमेंट पाईपमध्ये दोन बोटांचे अंतर (गॅप) ठेवण्यात आले आहे. दोन पाईपांना एकमेकांशी पूर्णतः जोडण्यात (जॉईंट) आले नाही. दोन सिमेंट पाईपमध्ये गोल कडे बसवून त्यात सिमेंट भरण्यात न आल्याने दोन्ही पाईपमध्ये मोठी गॅप राहिली. त्यामुळे सिमेंट पाईप मधून वाहणारे सांडपाणी नालीसाठी खोदलेल्या खड्यात साचू लागले. त्याच भूमिगत नालीला लागून सार्वजनिक नळाची पाईप लाईन गेली आहे. २० दिवसांपूर्वी नळाची ही पाईप लाईन फुटली. आणि खड्यात साचून असलेलं घाण पाणी फुटलेल्या पाईप लाईन मधून नळाला येऊ लागलं. त्यामुळे गावकरी कमालीचे संतापले आहेत. १५ दिवस नळाद्वारे दूषित पाणी आल्याने गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायतेविषयी कमालीचा असंतोष खदखदत आहे. ग्रामपंचायत व कंत्राटदाराची मिलीभगत असल्याच्या चर्चा आता गावात रंगू लागल्या आहेत.
वागदरा या गावात काही महिन्यांपूर्वी भूमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले. नालीचे खोदकाम केल्यानंतर सिमेंट पाईप टाकण्यापूर्वी खाली बेड काँक्रीट टाकण्याची कंत्राटदाराला गरजच वाटली नाही. यावरच कंत्राटदाराचा बेजाबदारपणा थांबला नाही तर त्याने दोन सिमेंट पाईपांमधली गॅप देखील भरली नाही. दोन सिमेंट पाईपमध्ये मोठी गॅप राहिल्याने सिमेंट पाईप मधून वाहणारं सांडपाणी नालीसाठी केलेल्या खड्यात मुरू लागलं. त्याच भूमिगत नालीला लागून गावात पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन गेली आहे. २० दिवसांपूर्वी ही नळाची पाईप लाईन फुटली. फुटलेल्या पाईप लाईन मधून त्याठिकाणी साचलेलं घाण पाणी नळाद्वारे येऊ लागलं. हा गंभीर प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर गावकरी कमालीचे संतापले आहेत. १५ दिवस गटाराचं पाणी फुटलेल्या पाईप लाईन मधून नळाला आल्याने गावकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निकृष्ठ दर्जाची कामे करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. नळाला आलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. कंत्राटदाराच्या तकलादू कामांमुळे सोइ सुविधा कमी व गावकऱ्यांना असुविधा जास्त होऊ लागली आहे. विकासकामांच्या नावावर निव्वळ निधीची उधळण व टक्केवारी साधली जात असल्याच्या खुल्या चर्चा आता गावातून ऐकायला मिळत आहे. दर्जाहीन कामे करून बिले काढून घ्यायची, हे धोरणच सुरु झाले आहे. विकासकामांवर निधी खर्च केला जातो पण ती कामे किती काळ टिकतील याची कुठलीही हमी घेतली जात नाही. त्यामुळे तीच ती कामे वारंवार होतांना दिसतात. केवळ आपली टक्केवारी साधण्याकरिता विकासकामे केली जातात की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांमधून होऊ लागली आहे.




No comments: