प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात घरफोडी व चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. शहरातील सहारा पार्क येथे दिवसाढवळ्या घडलेली घरफोडीची घटना ताजी असतांनाच चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एका घरात चोरीचा डाव साधला आहे. शेतकरी मंदिराजवळ राहत असलेल्या उपाध्ये भोजनालय मालकाच्या घरात चोरटयांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उपाध्ये कुटुंबं घरात झपलेलं असतांना मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याची माळ व रोख रक्कम लंपास केली. यावरून चोरटे प्रचंड निर्ढावले असल्याचे दिसून येते. धाडसी चोरी व घरफोडी करून चोरटे एकप्रकारे पोलिसांना आव्हान देऊ लागले आहेत. कुटुंबं घरात असतांना देखिल चोरटे चोरी करण्याचं धाडस करू लागल्याने शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. एका पाठोपाठ एक चोरीच्या घटना घडू लागल्याने चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
शहरातील शेतकरी मंदिराजवळील उपाध्ये भोजनालयासमोर वास्तव्यास असलेल्या द्रौपदी विष्णू उपाध्ये (६५) यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना आज १९ फेब्रुवारीला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. उपाध्ये दाम्पत्य पहाटे झोपेतून उठल्यानंतर त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तथा घरातील लोखंडी कपाटाचे दारही सताड उघडे दिसले. त्यांनी कपाटात ठेवलेली १५ ग्राम वजनाची सोन्याची मोहनमाळ व रोख १५ हजार रुपये तेथे आढळून आले नाही. त्यामुळे त्यांना घरात चोरी झाल्याची खात्री पटली. द्रौपदी उपाध्ये व त्यांचे पती विष्णू उपाध्ये (७०) हे भोजनालय बंद करून रात्री ११.३० वाजताच्या सुमारास झोपी गेले. दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेऊन असलेली १५ ग्राम वजनाची सोन्याची मोहनमाळ किंमत ५४ हजार रुपये व रोख १५ हजार रुपये असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. सोन्याची माळ व रोख रक्कमेवर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर द्रौपदी उपाध्ये यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: