क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारा विदर्भ केसरी शंकरपट राहील जनतेच्या नेहमी स्मरणात

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहरातील भव्य जत्रा मैदानावर मागील दोन दिवसांपासून शंकरपटाचा थरार सुरु असून शंकरपट पाहण्याकरिता शेतकरी बांधवांसह वणी उपविभागातील जनतेची जत्रा मैदानावर एकच गर्दी पहायला मिळत आहे. शंकरपटाचा थरार अनुभवण्याकरिता नागरिकांची पावले जत्रा मैदानाकडे वळतांना दिसत आहे. या भव्य शंकरपटाचा थरार अनुभवण्याकरिता उसळलेल्या नागरिकांच्या गर्दीने जत्रा मैदान फुलून निघालं आहे. शंकरपटातील बैलांच्या शर्यती बघण्याच्या उत्साहापोटी वणी शहर व आसपासच्या गावातून आलेले नागरिक भर उन्हातही शंकरपटाचा आनंद लुटताना दिसत होते. तब्बल २६ वर्षानंतर शहरात शंकरपटाचं आयोजन करण्यात आल्याने सर्वांचाच उत्साह शिगेला पोहचला होता. बैलगाडा हाकताना बैलांच्या सुसाट पळत सुटण्याचा थरार अनुभवण्याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. नागरिक शंकरपट सुरु होण्याच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी २० तारीख उजाळली आणि शंकरपटाचा भव्य असा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. राज्य पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या संकल्पनेतून २६ वर्षानंतर शहरात विदर्भ केसरी शंकरपट साकारला. शंकरपटाच्या (गावगाडा) या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांचीही अलोट गर्दी उसळली होती.  

संजय खाडे व मित्र परिवाराच्या वतीने दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित विदर्भ केसरी शंकरपटाचे उद्घाटन माजी आमदार वामनराव कासावार यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष माजी आमदार राजू तिमांडे (हिंगणघाट) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र गायकवाड, नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, प्रा. शंकर वऱ्हाटे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद वासेकर, संजय निखाडे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय खाडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शंकरपटाच्या आयोजनामागचा उद्देश हा कास्तकारांना शेतीच्या कामातून थोडा विरंगुळा मिळावा आणि काही काळ का होईना त्यांना चिंतामुक्त वातावरणात वावरता यावे, हा असल्याचे सांगितले. या विदर्भ केसरी शंकरपटाचा शुभारंभ श्रुती वाळगे या १८ वर्षीय तरुणीच्या बैलजोडी हाकण्याने झाला. या तरुणीने हाकलेली बैलजोडी शंकरपट स्पर्धेचे खास आकर्षण ठरली. त्यानंतर वणी विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित गावगाडा स्पर्धेला सुरवात झाली. या स्पर्धेत वणी, मारेगाव व झरी येथील स्पर्धकांकडून ३० बैलजोड्या हाकण्यात आल्या. 

२१ फेब्रुवारी पासून मुख्य विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात झाली. २१ फेब्रुवारीला ४० पेक्षाही जास्त बैलजोड्या हाकण्यात आल्या. २२ फेब्रुवारीला शंकरपटाची सांगता होणार असून सायंकाळी ४ वाजता बक्षिस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान या शंकरपटाच्या निमित्ताने दूरवरून आलेल्या स्पर्धक, कास्तकार व जनतेसाठी प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम व रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नाट्यकलाकृतीचे देखील आयोजन करण्यात आले होते. शंकरपट व त्यानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संजय खाडे व मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले. 

शंकरपटातील गावगाडा स्पर्धेत राधाने मैदान गाजविले. या स्पर्धेत गणेशपूर येथिल राधा बोबडे या तरुणीने स्वतः बैलजोडी हाकत ८.३३ सेकंदात अंतर पार करून पाचवा क्रमांक पटकाविला. तसेच या स्पर्धेत राजूर (ई.) येथिल भाविका मिलमिले या तरुणीने देखील सहभाग घेतला होता. या दोन्ही तरुणींच्या हिंमत व जिद्दीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. शंकरपटातील गावगाडा स्पर्धेत प्रथम क्रमांक रांगणा येथील गुणवंत वांढरे यांच्या तेजा व वायफर या बैलजोडीने पटकावला. अवघ्या ८.१ सेंकदात या जोडीने अंतर पार केले.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी