मद्यपींनी एकमेकांच्या डोक्यावर फोडल्या बियरच्या बॉटल, बियरबारमध्ये दोन गटात तुफान राडा
प्रशांत चंदनखेडे वणी
मद्यपींमध्ये दारू पिण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि युवकांच्या दोन गटांमध्ये जबर हाणामारी झाली. युवकांनी एकमेकांना हाणामारी करतांनाच बियरच्या शिश्या एकमेकांच्या डोक्यावर मारल्याने दोनही गटातील युवक जखमी झाल्याची घटना काल २२ जानेवारीला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील एका (व्ही) बियरबारमध्ये घडली. याबाबत दोन्ही गटातील युवकांनी परस्पर विरोधी तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी दोन्ही गटातील युवकांवर गुन्हे दाखल केले आहे.
व्ही बियरबारमध्ये मद्य सेवन करण्याकरिता गेलेल्या युवकांच्या दोन गटांमध्ये दारू पिण्यावरून वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोनही गटातील युवकांनी बियरच्या शिश्या एकमेकांच्या डोक्यात हाणल्या. यात दोन युवक जखमी झाले. याबाबत शेख अजहर मो. शफी (३५) रा. शास्त्री नगर याने दिलेल्या फिर्यादीवरून तो व त्याचे मित्र बियरबारमध्ये बसून मद्य सेवन करीत असतांना तेथेच छोटू रॉय व त्याचे मित्र देखील मद्य सेवन करीत होते. काही वेळाने छोटू रॉय हा अजहर व त्याचे मित्र बसून असलेल्या टेबलकडे आला, व अजहरला दारू पाजण्याकरिता आग्रह धरू लागला. परंतु अजहरने त्याचा दारूचा खर्च करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे छोटू रॉयने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. छोटूने वाद घालताच त्याचे मित्रही धावून आले. आणि त्यांनी अजहर व त्याच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणी दरम्यान छोटूने टेबलवर ठेऊन असलेली बियरची बॉटल अजहरच्या डोक्यावर मारली. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याने झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. अजहर शेख याच्या तक्रारी वरून पोलिसांनी छोटू रॉय (३२) रा. कुंभारखनी, राहुल चिंचोलकर (२३) इंदिरा चौक, जमीर उर्फ मेहबूब शेख (२९) रा. मेघदूत कॉलनी या आरोपींवर भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तर राहुल चिंचोलकर याच्या तक्रारी नुसार तो आपल्या मित्रांसोबत व्ही बियरबारमध्ये दारू पीत असतांना समोरच्या टेबलवर दारू पित असलेल्या अजहर व त्यांच्या मित्रांकडे छोटू रॉय गेला. त्यांच्यात काही वेळ चर्चा झाल्यानंतर अचानक वाद उफाळून आला. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून राहुल चिंचोलकर व त्याचा मित्र जर्मन हा मध्यस्थी करण्यास गेला असता अजहरने टेबलवर ठेऊन असलेली बियरची बॉटल राहुलच्या डोक्यात हाणली. यात तो जखमी झाला असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याबाबत त्याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अजहर शेख (३५), सलमान शेख (३३), अशपाक शेख (३६) तिघेही रा. शास्त्री नगर यांच्यावर भादंवि च्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात जमादार जगदीश बोरनारे करीत आहे.
शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीने परत डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शहरात भाईगिरीही वाढू लागली आहे. शुल्लक कारणांवरून वाद घालणे, मारहाण करणे, या घटना वाढू लागल्या आहेत. संघटित गुन्हेगारी शहरात फोफावू लागली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचे टोळके शहरात भाईगिरीचा उन्माद आणू लागले आहेत. युवकांचे हे टोळके शहरात उधम करतांना दिसत आहेत. त्यांच्यावर वचक निर्माण करणे गरजेचे झाले आहे. शहरातील बहुतांश बियरबार हे रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. वेळेचं बंधन झुगारून बियरबारमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपींना सेवा पुरविली जाते. मुख्य शटर बंद करून बियरबारचा चोरटा मार्ग मध्यरात्रीपर्यंत सुरु असतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. रात्री युवकांचे टोळके मनसोक्त दारू ढोसतात. आणि धिंगाणा घालतात. एकमेकांशीच राडा करतात. त्यामुळे बियरबार बंद करण्याची वेळ झाल्यानंतरही आतमध्ये नियमबाह्य सेवा पुरविणाऱ्या बियरबार मालकांवर कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे आता सुद्य नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. तेंव्हा याकडे संबंधित विभाग व पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment