नंदीग्रामचा मार्ग बल्लारपूरकडे वळणार, लोकसभेचा हा खेळ जनतेला नाही कळणार
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी मार्गे प्रवासी रेल्वे सुरु व्हावी याकरिता प्रवासी संघटनांनी सतत रेल्वे विभाग व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर नागपूर-मुंबई (व्हाया वणी, आदिलाबाद, नांदेड) नंदीग्राम एक्सप्रेस सुरु करण्यात आली. त्यानंतर वणी मार्गे काही साप्ताहिक रेल्वेही सुरु करण्यात आल्या. परंतु दैनंदिन प्रवासी वाहतूक करणारी नंदीग्राम एक्सप्रेस कोविड काळात बंद करण्यात आली. त्यानंतर कोविडची साथ निवळल्यानंतरही अद्याप नंदीग्राम एक्सप्रेस ही वणी मार्गाने सुरु करण्यात आलेली नाही. परंतु आता निवडणुकांचा काळ लक्षात घेता आदिलाबाद पर्यंत येणारी नंदीग्राम एक्सप्रेस ही वणी मार्गे बल्लारपूर पर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र नंदीग्राम एक्सप्रेस ही पूर्ववत नागपूर वरून चालविण्याचा कुठलाही प्रयत्न आजपावेतो करण्यात आलेला नाही. नंदीग्राम एक्सप्रेस ही नागपूर वरून सुरु करण्याची प्रवाशांची मागणी असतांना नंदीग्राम एक्सप्रेसने लोकसभा क्षेत्र जोडण्याचा निरर्थक प्रयत्न केला जात आहे.
वणी वरून चंद्रपूरचे अंतर ५५ किमी एवढे आहे. वणी-चंद्रपूर मार्गाचे चौपारीकरणही झाले आहे. वणी वरून घुग्गुस मार्गे चंद्रपूर जाण्याकरिता फार वेळ आणि पैसा खर्च होत नाही. बहुतांश नागरिक हे आपल्या वाहनांनीच वरोरा, भद्रावती व चंद्रपूरचा प्रवास करतात. त्यामुळे बल्लापूरकडे जाण्याकरिता रेल्वेची तेवढी आवश्यकता वाटत नाही. उलट नागपूरचे अंतर १३५ किमी आहे. नागपूरला जाण्याकरिता एसटी बस किंवा खाजगी प्रवासी वाहने २०० रुपये तिकीट आकारतात. येथील जनतेला महिन्यातून कित्येकदा नागपूरचा प्रवास करावा लागतो. वणी उपविभागातील कित्येक प्रवासी सतत नागपूरला जाणे येणे करतात. नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करतांना प्रवाशांना ९० रुपये तिकीट लागायची. आता त्यांना नागपूरच्या प्रवासाकरिता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस ही चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यांना जोडायची. माजरी, वरोरा, हिंगणघाट, सेवाग्राम आणि नागपूर हा सरळ प्रवास प्रवाशांना करता यायचा. आता वर्धा व सेवाग्रामला जाण्याकरिता नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जेथे ७० रुपयांमध्ये जाणे व्हायचे तेथे २५० रुपये लागतात. त्यामुळे हा कठीण प्रवासाचा मार्ग बदलून लोकसभेचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न चालविला असल्याची खुली चर्चा आता जनतेतून ऐकायला मिळत आहे.
नागपूर हे उपराजधानीचं ठिकाण असून येथिल बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता नागपूरला जातात. अभियांत्रिकी तथा वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता जास्तीतजास्त विद्यार्थी नागपूरची निवड करतात. उच्च शिक्षणाकरिता नागपूर येथे शिकवणी वर्ग व महाविद्यालयीन प्रवेश घेणारे बरेच विद्यार्थी या भागातील आहेत. त्यांना वणी-नागपूर हा नेहमी प्रवास करावा लागतो. तसेच अनेक महत्वाची कामेही नागपूर येथेच होतात. त्यामुळे वणी उपविभागातील नागरिकांचे सतत नागपूर जाणे येणे सुरु असते. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही नेहमी नागपूरची वारी करावी लागते. त्यामुळे रस्ते मार्गाने त्यांच्या खिशाला कात्री लागताना दिसत आहे. रेल्वने १०० रुपयांपेक्षाही कमी खर्चात नागपूरला जाणे व्हायचे. आता २०० रुपये खर्च सोसावा लागत आहे. नागपूर येथे उपचार घेणारे अनेक रुग्ण आहेत. ज्यांना महिन्या दोन महिन्यातून नागपूर येथे जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी व उपचार घ्यावा लागतो. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मोफत प्रवासाचा पास, रेल्वे दवाखाना तथा इतर महत्वपूर्ण कामांकरिता वेळोवेळी नागपूरला जावं लागतं. वणी वरून दैनंदिन प्रवासी गाडी नसल्याने त्यांनाही अतिरिक्त शुल्क मोजून बस किंवा खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो.
त्याचप्रमाणे सेवाग्राम व वर्धा जाणाऱ्या प्रवाशांनाही नंदीग्राम बंद झाल्याने मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. वणी-वर्धा हा मोठा खडतड मार्ग आहे. बसच्या प्रवासाचा हा सोयीचा मार्ग नाही. वणी वरून वर्धेला जातांना ठिकठिकाणी बस बदलावी लागते. त्यामुळे नागरिकांचा बराच वेळ व पैसा खर्च होऊ लागला आहे. परंतु रेल्वेचा मार्ग हा अत्यंत सोयीचा व सरळ आहे. सावंगी व सेवाग्राम येथेही उपचाराकरिता जाणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. नंदिग्रामने त्यांचा कमी खर्चात प्रवास व्हायचा. आता रुग्णांनाही प्रवास करतांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे गरजेच्या मार्गावर प्रवासी रेल्वे सुरु करण्याऐवजी लोकसभेचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या रोचक चर्चा आता नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. तेंव्हा जनतेचे लक्ष वळविण्याऐवजी नागरिकांना आवश्यक असलेल्या मार्गाने नंदीग्राम वळविण्याची मागणी प्रवाशांमधून होऊ लागली आहे.
बरोबर आहे, नंदीग्राम एक्सप्रेस ही नागपुर वरुणच सुरु व्हायला हवी
ReplyDelete