संविधान चौक येथे घडला विचित्र अपघात, एकाचवेळी दोन ट्रकांनी दोन दुचाकींना दिली धडक, एक ठार तर एक गंभीर जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी वरोरा मार्गावरील संविधान चौक येथे विचित्र अपघात घडला. कोळसा वाहतुकीच्या दोन ट्रकांनी एकाचवेळी दोन वेगगवेगळ्या मोटारसायकलींना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून एकाला किरकोळ मार लागला आहे. परंतु दैव बलवत्तर म्हणून हे दोघेही थोडक्यात बचावले. एका अपघातात दुचाकी ट्रकखाली आल्याने दुचाकीचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. मात्र दुचाकीस्वाराने समय सूचकता दाखवीत दुचाकीवरून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. तसेच दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज २८ फेब्रुवारीला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वरोरा येथील पारस ऍग्रो प्रोसेस या कंपनीत कार्यरत असलेले दोन जण वणी येथे कंपनीच्या कामानिमित्त आले होते. येथील कंपनीचे काम आटपून ते वरोऱ्याकडे परतत असतांना संविधान चौकातील वळण रस्त्यावर कोळसा वाहतुकीच्या भरधाव ट्रकने (MH ३४ AB ६२३२) त्यांच्या दुचाकीला (MH ३४ AQ ९०४७) जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक रोडच्या विरुद्ध बाजूला पडल्याने तो थोडक्यात बचावला. तर दुचाकीवर मागे बसून असलेला तरुण ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दिलीप खेमसिंग अंधवानी (१७) रा. बालाघाट असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो वरोरा येथील पारस ऍग्रो प्रोसेस या कंपनीत कामाला होता. मृतक दिलीप हा राहुल सुभाष बोरा (४०) रा. वरोरा या त्याच्या सुपरवायझर सोबत कंपनीच्या कामाकरिता वणीला आला होता. राहुल बोरा हा दुचाकी चालवीत होता. तर दिलीप हा मागे बसला होता. या अपघातात राहुल बोरा हा गंभीर जखमी झाला आहे. 

त्याचवेळी संविधान चौकात झालेल्या दुसऱ्या अपघातात कोना (सावर्ला) येथून वणीला येत असलेल्या गणेश उपरे या तरुणाच्या दुचाकीला (MH २९ एक ३२६) कोळसा वाहतूक करणाऱ्या टिप्परने (MH ३४ BG २०६२) जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराने समय सूचकता दाखविल्याने तो थोडक्यात बचावला. ट्रक दुचाकीला धडकणार तोच गणेश उपरे याने दुचाकीवरून उडी मारली. मात्र दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीचा पार चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात गणेश उपरे हा किरकोळ जखमी झाला असून मृत्यूच्या दाढेतून तो सुखरूप बचावला आहे. गणेश उपरे हा थोडक्यात बचावल्याने "काळ आला होता पण वेळ आली नव्हती", या प्रतिक्रिया घटनास्थळावर व्यक्त होतांना दिसत होत्या. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेले दोन्ही ट्रक ताब्यात घेतले असून ट्रक चालकांवर गुन्हे दाखल केले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

संविधान चौक वळण मार्ग हा अपघात प्रवणस्थळ ठरू लागला आहे. याठिकाणी यापूर्वीही भीषण अपघात झाले आहेत. अपघातात कित्येक निष्पाप जीवांचे बळी देखील गेले आहेत. यवतमाळ, वरोरा, वणी व घुग्गुसकडे जाणारी मालवाहू तथा प्रवासी वाहने संविधान चौकातून वळतात. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करणे गरजेचे असतांना रहदारीने गजबजलेल्या या चौकात वाहतूक पोलिस नेमण्यात आलेला नाही. कोळसा वाहतुकीची शेकडो वाहने या मार्गाने धावतात. कोळसा वाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे कित्येक अपघात घडले असून अनेक निष्पाप जीवांचे या अपघातात बळी गेले आहेत. भरधाव व निष्काळजीपणे वाहने चालविली जात असल्याने अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कोळसा वाहतुकीच्या वाहनांना नियम लावण्यात व वाहनांच्या वेगाला लगाम लावण्यात वाहतूक पोलिस असमर्थ ठरताना दिसत आहे. कित्येक वर्षांपासून वाहतूक शाखेत ठिय्या मांडून बसलेल्या वाहतूक पोलिसांच्या मधुर संबंधांमुळे कोळसा वाहतूकदारांचे लाड पुरविले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे हे सर्वप्रथम घटनास्थळी पोहचले. त्यांनीच जखमीला तात्काळ रुग्णलयात दाखल केले. अजिंक्य शेंडे यांनी काही महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेत ठिय्या मांडून असलेल्या त्या वाहतूक पोलिसाची बदली करण्याची पोलिस अधीक्षकांकडे मागणी केली होती. पण त्या वाहतूक पोलिसाची पोलिस खात्यात पकड मजबूत असल्याने त्याचं कुणीच काही बिघडवू शकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा स्वभावही आता उद्धट बनला आहे. वाहतुकीच्या समस्येबाबत काहीही लिहा मला फरक पडत नाही,  असे तो गर्वाने म्हणतो. त्यामुळे वणी येथे वाहतुकीचा विषयच गंभीर बनला आहे. वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. त्यामुळे निष्पाप जीवांचे नाहक बळी जाऊ लागले आहेत. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी