टवाळखोर तरुणांनी मांडला उच्छाद, विद्यार्थिनींचे शाळा, कॉलेज व शिकवणी वर्गांना जाणे झाले कठीण
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात टवाळखोर तरुणांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्गांना जाणाऱ्या मुलींचा पिच्छा पुरविणे, त्यांना हातवारे करणे, त्यांची छेड काढणे, अश्लील कॉमेंट करणे, त्यांना प्रपोज करण्याचा प्रयत्न करणे हा या टार्गट तरुणांचा नित्यक्रम बनला आहे. हे रोड रोमियो शाळा, कॉलेज व शिकवणी वर्ग असलेल्या मार्गावर झुंडीने उभे राहतात. आणि विद्यार्थिनींचा माग काढतात. मजनू बनून त्यांच्या मागेपुठे घुटमळतात. या सडकछाप मजनूंच्या उच्छादामुळे विद्यार्थीनींचं शिक्षण घेणं कठीण झालं आहे. त्यांच्या टवाळखोरीमुळे विद्यार्थिनी कमालीच्या भयभीत झाल्या आहेत. या टपोरी तरुणांचा बंदोबस्त करण्याची तक्रार घेऊन काही विद्यार्थिनींनी पोलिस स्टेशन गाठल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळे निर्माण करू पाहणाऱ्या या टवाळखोर तरुणांना पोलिसांनी अद्दल घडविण्याची खरोखरच गरज निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
शहरात टवाळखोर तरुणांचे टोळके उच्छाद घालतांना दिसत आहे. हे टोळके नेहमी विद्यार्थिनींच्या मागावर असतात. विद्यार्थिनींचा माग काढून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या टवाळखोरांकडून केला जात आहे. मुलींना जबरदस्ती प्रपोज करण्याचा प्रयत्नही या टवाळखोर तरुणांकडून करण्यात येत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहे. मुलींना आकर्षित करण्याकरिता हे टार्गट तरुण टोकाची मजनूगिरी करतांना दिसतात. मुलींना रस्त्यात अडविणे, त्यांच्यावर प्रेम लादण्याचा प्रयत्न करणे हा या टार्गट तरुणांचा दिनक्रम झाला आहे. सडकछाप मजनूंच्या या लतिफशाहीमुळे अल्पवयीन मुलींचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं आहे. विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने शाळकरी विद्यार्थिनींचं भविष्य अंधकारमय होण्याचा धोका निर्माण आहे. त्यामुळे पालकवर्ग चांगलाच चिंतेत आला आहे. बाईक रॅली निघाल्यागत या टवाळखोर तरुणांचे झुंड मोटारसायकलने गल्लोगल्ल्ली फिरतांना दिसतात. मुलींच्या घरापर्यंत जाऊन आपली दबंगगिरी दाखविण्याइतपत या सडकछाप मजनूंच्या हिंमती वाढल्या आहेत. एसीबी लॉन मार्गे विठ्ठलवाडीकडे जाणारा मार्ग या टार्गट तरुणांच्या चिडीमारीचा अड्डा बनला आहे. शहरातील मुख्य महाविद्यालय असलेल्या मार्गावरही हे टवाळखोर घुटमळत असतात. शाळा, कॉलेज व शिकवणी वर्ग असलेल्या मार्गांवर या टपोरी तरुणांचा उच्छाद पहायला मिळतो.
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना तर हे टपोरी तरुण अक्षरशः धास्तावून सोडतात. बस्थानकापर्यंत विद्यार्थिनींचा पिच्छा पुरविला जातो. विद्यार्थिनी या टार्गट तरुणांची टिंगल टवाळी निमूटपणे सहन करतात. कारण पालकांना याबाबत सांगितले तर आपल्या शिक्षणात बाधा येईल ही भीती त्यांना असते. किंवा हे टपोरी तरुण पालकांनाही अपमानित करतील या भीतीपोटी विद्यार्थिनी त्यांचा मानसिक त्रास गुपचूप सहन करतात. त्यामुळे या टवाळखोर तरुणांच्या हिंमती चांगल्याच वाढल्या आहेत. त्यांना पोलिसांचा जराही धाक उरल्याचे दिसत नाही. कारण राजकारणाशी जुळलेले काही गुंड प्रवृत्तीचे युवक त्यांचे वदरहस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिसांनी आता संबंध न जोपासता त्यांची वरात काढणं गरजेचं झालं आहे. कारण बहुतांश तरुणी बदनामीच्या भीतीने सर्वकाही निमूटपणे सहन करीत आहे. परंतु या बहिणींच्या रक्षणासाठी आता पोलिस भाऊ त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त करण्याकरिता पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची मागणी शहरातून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment