शतकांची परंपरा लाभलेला शंकरपट होणार वणी शहरात, २० फेब्रुवारी पासून होईल शंकरपटाची सुरुवात
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्रातील शंकरपटाची परंपरा सुरु ठेवतांना वणी येथे माजी खासदार दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मरणार्थ भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष तथा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या पुढाकारातून वणी येथिल शंकरपटाचा इतिहास पुनर्जीवित करण्यात आला आहे. तब्बल २६ वर्षानंतर याठिकाणी शंकरपटाचा थरार रंगणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. शंकरपटाचा थरार अनुभवण्याकरिता नागरिक उत्सुक झाले आहेत. २० फेब्रुवारी पासून शहरातील भव्य जत्रा मैदानावर हा शंकरपट भरणार असून तीन दिवस ही स्पर्धा चालणार आहे. या विदर्भ केशरी शंकरपट स्पर्धेत बैलांच्या चित्त थरारक शर्यती वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला पहायला मिळणार आहे. या शंकरपटात १५० ते २०० बैलजोड्या सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितलं आहे. शंकरपटातील बैलजोड्यांच्या या स्पर्धेकरिता लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
विदर्भ केशरी शंकरपट ही स्पर्धा दोन गटात विभागण्यात आली आहे. पहिल्या गटात पूर्ण वाढ झालेल्या बैलजोड्यांचा समावेश असेल, तर दुसऱ्या गटात तरुण बैलजोड्यांचा (गोऱ्हे) सहभाग असणार आहे. या शंकरपटात नाशिक, पुणे, नागपूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव येथून बैलजोड्या येणार आहेत. वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा शंकरपट ही विशेष स्पर्धा होणार असून यात केवळ वणी, मारेगाव व झरी येथीलच शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. अ व क गटात होणाऱ्या या स्पर्धेत लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. अ गटातील प्रथम बक्षिस १ लाख १ हजार, द्वितीय बक्षिस ७१ हजार तर तृतीय बक्षिस ५१ हजार रुपये राहणार असून क गटातील प्रथम बक्षिस ४१ हजार, द्वितीय ३१ हजार तर तृतीय बक्षिस २१ हजार रुपये राहणार आहे. शहरातील या भव्य शंकरपटाच्या आयोजन व यशस्वीतेकरिता आयोजन समिती तथा संजय खाडे मित्र परिवार अथक परिश्रम घेत आहे.
२६ वर्षानंतर प्रथमच शहरात शंकरपटाचा थरार रंगणार आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया देतांना संजय खाडे यांनी म्हटले की, शंकरपट ही केवळ बैलांची शर्यत नसून तो आपल्या कृषी संस्कृतीचा एक भाग आहे. गेल्या अनेक शतकांची याला परंपरा लाभली आहे. अलीकडेच यावरील बंदी उठली. त्यामुळे शेतकऱ्यांची ही परंपरा जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथे २६ वर्षानंतर शंकरपट होणार असल्याने वणी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शंकरपटाचा थरार अनुभवावा.
Comments
Post a Comment