प्रशांत चंदनखेडे वणी
महाविद्यालयीन शिक्षण घेणारी अठरा वर्षीय मुलगी शेजाऱ्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना आज ४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कुरई या गावात घडली. शेजाऱ्याच्या घराच्या टिनाच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलगी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शेजाऱ्याच्या घरी जाऊन तिने गळफास घेतल्याने चर्चेला पेव फुटले आहे. शेजाऱ्याच्या घरातील टिनाच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला नारळी दोरीने लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. पायल श्रीराम गेडाम (१८) असे या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मुलीचे नाव आहे.
मृतक पायल हिच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार त्यांची मुलगी कोरपना येथील महाविद्यालयात १२ वि ला शिक्षण घेत होती. ते स्वतः शेतमजूर असून शेतमजुरी करून ते आपला प्रपंच चालवितात. त्यांना एक १६ वर्षाचा मुलगा देखील आहे. ४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता ते शेत मजुरी करून घरी परतले असता त्यांना पायल ही घरी आढळून आली नाही. त्यांनी गावात सर्वत्र तिचा शोध घेतला. पण ती कुठेच दिसली नाही. शेवटी घराशेजारी राहणाऱ्या नत्थू कुळसंगे यांच्या घरी त्यांनी जाऊन बघितले. तेंव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. शेजाऱ्याच्या घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला पायल ही दोरीने लटकलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आली. त्यांनी लगेच आपल्या पुतण्याच्या मदतीने तिला खाली उतरविले, व तात्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
पायल हिचे शेजाऱ्याच्या घरी जाणे येणे होते. ती नेहमी नत्थू कुलसंगे यांच्या घरी जात असायची. परंतु त्यांच्याच घरी तिचा नारळी दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने चर्चेला पेव फुटले आहे. नत्थू कुळसंगे यांच्या घराच्या टिनाच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला नारळी दोरीने लटकलेल्या अवस्थेत पायल हिचा मृतदेह आढळून आला. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून शवविच्छेदन अहवालातून ते लवकरच स्पष्ट होईल. १२ वि ची विद्यार्थिनी असलेल्या पायल हिचा शेजाऱ्याच्या घरी दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. मृतक पायल हिचे वडील श्रीराम घुलाराम गेडाम (४७) यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली असून त्यांच्या तक्रारी वरून पोलिस पुढील तपास करीत आहे.

No comments: