ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीला घेऊन ओबीसींचा शहरात विराट एल्गार मोर्चा

प्रशांत चंदनखेडे वणी 

इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) जातनिहाय जनगणना करण्यास सरकार उदासीनता दर्शवित असल्याने ओबीसी प्रवर्ग आक्रमक झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गाकडून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु सरकार मात्र टोलवाटोलवी करीत आहे. त्यामुळे बिहार राज्याच्या धर्तीवर महारष्ट्रातही ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीला घेऊन ओबीसी (व्हीजे,एनटी,एसबीसी) समाज एकवटला असून ११ फेब्रुवारीला उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा विराट मोर्चा निघणार आहे. स्थानिक शासकीय मैदानावरून (पाण्याची टाकी) दुपारी १२ वाजता या ओबीसी एल्गार मोर्चाची सुरुवात होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या रान पेटले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करून नये, ही देखील ओबीसी प्रवर्गाकडून मागणी करण्यात आली आहे. 

सरकारने ओबीसींची (व्हीजे,एनटी,एसबीसी) जातनिहाय जनगणना करावी तसेच मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसह इतर १८ मागण्यांना घेऊन ओबीसी (व्हीजे,एनटी,एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वयक समिती वणी, मारेगाव व झरी तालुक्याच्या वतीने वणी उपविभागीय कार्यालयावर ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत असतांना सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे सोडून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न सरकारने चालवला आहे. हा ओबीसींवर एकप्रकारे अन्याय आहे. सरकारने ओबीसींविरुद्ध अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. ओबीसींचे प्रश्न न सोडविता ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न सरकार कडून केला जात आहे. ओबीसी जात निहाय जनगणना कृती समितीने वेळोवेळी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला. तसेच आंदोलन मोर्चेही काढले. परंतु शासनाने ओबीसींच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही. बिहार सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करून त्यांची आकडेवारी सिद्ध केली. पण महाराष्ट्र सरकार मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यावर ठाम दिसत आहे. 

त्यामुळे आता ओबीसींची जातनिहाय जनगणना व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागण्यांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतमजूर शेतकऱ्यांचे प्रश्न, शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न व इतर १८ मागण्यांना घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती कडून भव्य ओबीसी (व्हीजे,एनटी,एसबीसी) एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात विविध जात समूहाच्या लोकांनी आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आणि सामाजिक हित साधण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती कडून करण्यात आले आहे. 

ओबीसी एल्गार मोर्चाची सुरुवात शासकीय मैदानावरून होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मोर्चाचा समारोप होऊन मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. या समारोप सभेत ओबीसी विचारवंत व प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. लक्ष्मण यादव (दिल्ली) यांचं व्याख्यान होणार आहे. ओबीसी बांधवांचे न्यायिक हक्क व पुढील वाटचालींसंदर्भात ते सभेला संबोधित करणार आहेत. सभा संपल्यानंतर ओबीसी शिष्टमंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती ओबीसी जनगणना कृती समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी