प्रशांत चंदनखेडे वणी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथे सन्मान स्त्री शक्तीचा, जागर कर्तृत्वाचा हा खास महिलांना समर्पित तीन दिवसांचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील या सोहळ्याचे थाटात आयोजन करण्यात आले आहे. ८, ९ व १० मार्च असे दिवस हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सन्मानार्थ आयोजित या सोहळ्यात प्रसिद्धी पासून दूर असलेल्या पण सकारत्मक कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महिलांमध्ये दडलेल्या कलागुणांचा अविष्कार घडविण्याकरिता एकल नृत्य स्पर्धा व सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा, या दृष्टिकोनातून मैत्री कट्टा ग्रुप द्वारा यावर्षीही स्त्री शक्तीचा जागर करण्यात येत आहे.
खास महिलांसाठी आयोजित या तीन दिवसीय सोहळ्यात ८ मार्चला दुपारी २ वाजता शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या पण सकारात्मक कार्यातून कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांचा साळी व चोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. ९ मार्चला सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य स्त्री सन्मान शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत विविध राज्यातील लोकनृत्य व देखावे सादर केले जाणार आहेत. या भव्य स्त्री सन्मान रॅलीचे उद्घाटन सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका किरण देरकर यांच्या हस्ते होणार असून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख, संध्या पोटे, गौरीशंकर खुराणा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
१० मार्चला सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकल व सामूहिक अशा दोन गटात ही नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे हे राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लि. वणीचे अध्यक्ष संजय खाडे, वसंत जिनिंग वणीचे संचालक रवि धानोरकर, नगराध्यक्ष मनिष मसकी, शामादीदी तोटावार, विनोद आदे हे उपस्थित राहणार आहे. समूह महिला नृत्य स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस ११००० रुपये, द्वितीय बक्षीस ७००० रुपये तर तृतीय बक्षीस हे ५००० रुपये राहणार असून एकल नृत्य स्पर्धेकरिता प्रथम बक्षिस ७००० रुपये, द्वितीय बक्षीस ५००० रुपये तर तृतीय बक्षिस ३००० रुपये ठेवण्यात आले आहे. नृत्य स्पर्धेत भाग घेण्याकरिता ५०० व २०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना आपलं कला कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी तथा त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने सन्मान स्त्री शक्तीचा, जागर कर्तृत्वाचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments: