प्रशांत चंदनखेडे वणी
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अभई येथिल युवकाने वेळाबाई शेत शिवारात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज १ मार्चला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मारोती प्रभाकर बल्की (३२) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो शेतात विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून सतत होणाऱ्या आत्महत्यांनी चिंता निर्माण केली आहे. जीवनातील आव्हाने व संकटांना सामोरे न जाता आत्महत्येचा पर्याय निवडला जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
वणी तालुक्यातील अभई या गावात वास्तव्यास असलेल्या मारोती बल्की युवकाने वेळाबाई येथील शेत शिवारात विषारी द्रव्य प्राशन करून जीवनाचा शेवट केला. आज सकाळी ९ वाजता तो शेतात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तोवर त्याचा मृत्यू झाला होता. त्याने नैराश्येतून मृत्यूला कवटाळल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत मृतकाचा भाऊ संतोष प्रभाकर बल्की (३०) याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील तपास शिरपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
No comments: