Latest News

Latest News
Loading...

वणी तालुका बनला रेती तस्करांचा गड, तस्करांपुढे प्रशासनही हतबल

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुका वाळू माफियांचा गड बनला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया सक्रिय आहेत. वणी तालुका रेती तस्करांचा बालेकिल्ला बनला असून तस्करांच्या काळ्या कमाईचा स्रोत बनला आहे. खनिज संपत्तीने नटलेला हा तालुका खनिज तस्करांसाठीही नंदनवन ठरला आहे. काही वर्षांपूर्वी तालुक्यातीलच काही तस्कर रेतीचा काळाबाजार करायचे. आता तालुक्याबाहेरील तस्करांनीही येथे पाय रोवले आहेत. तालुक्यात वाळू माफियांची पाळेमुळे घट्ट झाली आहेत. रेती तस्करीतून अनेक जण गब्बर झाले आहेत. अनेक वाळू चोरटे आता आलिशान जीवन जगतांना दिसत आहेत. काही रेती चोरटे व्हाईट कॉलर झाले आहेत. तर काही पांढरपेशींनी रेती तस्करीच्या या काळ्या धंद्यात उडी घेतली आहे. तालुक्यात रेती तस्करीचा गोरखधंदा चांगलाच फळफुलला आहे. तस्करांनी तालुक्यातील नदीपात्र अक्षरशः पोखरून टाकले आहेत. रेतीचे अवैध उत्खनन करून दिवसरात्र रेतीचा काळाबाजार केला जात आहे. काही तस्करांना पक्षाचे लेबल लागल्याने ते सुसाट सुटले असून त्यांनी रेतीघाटच काबीज केले आहेत. घाटातून रेती चोरी करतानाचे छायाचित्र व्हायरल होत असतांना कार्यवाही करण्यास मात्र  अधिकारी डगमगत आहेत. रेतीघाट सुरु होण्यापूर्वीही तस्करांनी उच्छाद मांडला होता, रेती घाट सुरु झाल्यानंतरही तस्करांची मांदियाळी पहायला मिळत आहे. 

रेती तस्करांवर कार्यवाही करण्यास महसूल विभागाने अवलंबलेलं उदासीन धोरण तालुक्यात वाळू माफियांचे अच्छे दिन आणण्यास कारणीभूत ठरलं आहे. रेती चोरीच्या एखाद दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही केली की, महसूल विभाग आपली पाठ थोपटून घेतो. पण मागील काही वर्षात रेती चोरीच्या वाहनांवर किती धडक कार्यवाया झाल्या, व त्यानंतर रेती तस्करीला आळा बसला काय, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. रेतीघाट बंद असतांना सर्रास रेती भरलेले ट्रक शहरात दिसत होते. अवैध रेती वाहतुकीचा सुळसुळाट असतांना महसूल विभाग यापासून अनभिज्ञ असल्याचे भासवत होता. शहर व तालुक्यात ठिकठिकाणी रेतीचा साठा दिसून येत होता. रेतीचे अवैध ढिगारे खुल्या डोळ्याने दिसत होते. पण महसूल अधिकाऱ्यांनी मात्र डोळ्यावर काळा चष्मा लावला होता. महसूल विभागाला बऱ्याच दिवसानंतर रेती चोरट्यांवर कार्यवाहीचा मुहूर्त मिळाला. २९ फेब्रुवारी व १ मार्चला रेती चोरीच्या दोन वाहनांवर कार्यवाही करण्यात आली. रेती चोरीचा एक मिनी ट्रक व एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयासमोर लावण्यात आले. रेती चोरी करतांना पकडलेला ट्रॅक्टर रेती तस्करीत रंगलेल्याच एका तस्कराचा असून नुकताच तो आतून बाहेर आला आहे. दोन चार महिन्यात रेती चोरीच्या दोन तीन वाहनांवर कार्यवाही करून महसूल विभागाने लक्षवेधी कामगिरी केल्याची खुली चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

रेती घाटातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेतीचा काळाबाजार सुरु असल्याची अनेक दिवसांपासून ओरड सुरु असतांना महसूल विभागाने मात्र चुप्पी साधली आहे. रेती तस्करांनी राजरोसपणे शहरात रेतीची अवैध वाहतूक करून दामदुप्पट किंमतीने रेती विकली. शिरपूर कायर मर्गेही रेतीची अवैध वाहतूक सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. गौणखनिजाची बिनधास्त तस्करी सुरु असतांना महसूल विभाला याची जराही खबर नसावी, याचेच नवल वाटते. वाळू माफियांनी रेती घाटांचे अक्षरशः लचके तोडले. वाळूची बेसुमार चोरी केली. दिवस रात्र रेतीची तस्करी सुरु आहे. पण रेती चोरीची वाहने महसूल विभागाच्या दृष्टीस पडत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. महसूल विभागाच्या मूक संमतीने तर रेतीचा काळाबाजार सुरु नाही ना, ही शंका उपस्थित करून ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोसिएशनने निवेदन दिले होते. रेती घाटातून ऑनलाईन रेती विक्री सुरु झाल्यानंतरही रेतीचा काळाबाजार थांबला नाही. रेती डेपोतूनही रेती चोरीचा फंडा शोधण्यात तस्करांनी कुबुद्धी लढविली. डेपोतून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत असल्याचे ट्रॅक्टर मालक असोसिएशनने निवेदनात म्हटले होते. उत्तम दर्जाची रेती चोरट्या मार्गाने तर माती मिश्रित रेती ऑनलाईन मागणी करणाऱ्यांना पुरविली जात आहे. घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याचे शासनाचे निर्देश असतांना  घरकुल योजनेतील लाभार्थी अद्यापही रेतीच्या प्रतिक्षेतच आहेत. पंतप्रधानांनी मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात १५ हजार रुपये वळते केले. पण रेतीचे काय, हा प्रश्न आता लाभार्थ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. २७०० च्या ही वर तालुक्यात मोदी आवास योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांच्या खात्यात १५ हजार रुपये तर आले. पण रेती पुरविण्याची जबादारी कुणाची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

वर्धा नदीच्या चिंचोली घाटातून बोटीच्या साहाय्याने दिवसाढवळ्या वाळूची चोरी केली जात असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. चिंचोली घटासह शेलू, रांगणा, भुरकी या घाटातूनही रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु आहे. मात्र महसूल विभागाला ती दिसत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. किंवा त्यांचे हात बांधल्या गेले असावे, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे. रेती तस्करीत गुंतलेलेच रोज महसूल विभागात घिरट्या घालत असतात. मग कसली कार्यवाही नी कसले काय. रेती घाटाकडे कुणी फिरकलं तरी राडे होतात. रेती तस्करांच्या हिमती सध्या सातव्या आसमानावर आहेत. गुंड प्रवृत्तीच्या लोकांची टोळीच तस्करीत सक्रिय आहे. रेती तस्करीच्या या काळ्या धंद्यात आता राजकारणही शिरलं आहे. एकीकडे जनतेचे प्रश्न उचलायचे आणि दुसरीकडे जनतेवर अन्याय करायचा हा खेळ राजकारणी खेळू लागले आहेत. गौण खनिजाच्या तस्करीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने वाळू माफियांचे गॉड फादर तयार झाले आहेत. त्यांच्याकडून तस्करीची सूत्रे हलविली जात आहे. त्यामुळे रेती तस्करीला उधाण आले असतांनाही कार्यवाहीचा बडगा उगारण्याची जोखीम कुणीही पत्करायला तयार होत नाही. दोन चार महिन्यात एखाद दोन कारवाया दाखवायच्या आणि गप्प बसायचं, हेच धोरण सध्या अवलंबलं जात आहे. २९ फेब्रुवारी व १ मार्चला रेती चोरीच्या दोन वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही करून आपलं कर्तव्य बजावलं आहे. त्यांच्या या कार्यवाहीने रेती चोरीला कितपत आळा बसेल, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

No comments:

Powered by Blogger.