विकासकामे तर झालीच नाही नाल्या तरी साफ होऊ द्या, मागासलेला भाग आमचा मागासलाच राहू द्या
प्रशांत चंदनखेडे वणी
नगर परिषदेला शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासन केवळ सक्तीची कर वसुली व निविदा काढण्यातच गुंग असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील नाल्यांची साफसफाईच न झाल्याने शहरवासियांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. नाल्यांच्या साफसफाईकडे नगर पालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. नाल्यांची साफसफाई न झाल्याने नाल्या जागोजागी तुंबल्या असून नाल्यांमध्ये साचून राहणाऱ्या घाणपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्यांमध्ये घाणपाणी साचून राहत असल्याने परिसरात मच्छरांचाही प्रकोप प्रचंड वाढला आहे. नाल्यांची साफसफाई करण्याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होऊ लागल्याने नगर पालिकेविषयी नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदू लागला आहे.
शहरातील काही भागात नगर पालिकेची भूमिगत गटार योजना अद्याप पोहचली नाही. या भागातील नाल्या सताड खुल्या आहेत. १५ ते २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्या आता ठिकठिकाणी फुटल्या आहेत. सिमेंट रस्तेही नावालाच उरले आहेत. पण विकासाची गंगा मात्र या भागांकडे वळली नाही. कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात सुरु आहेत. आपापल्या सोइ नुसार विकासकामे खेचली जात आहे. काही ठिकाणी वरचेवर रस्ते व नाल्यांचे बांधकाम केले जात आहे. तर काही भाग सिमेंट रस्ते व नाल्यांच्या बांधकामाची चातकासारखी वाट पाहत आहे. आमच्या भागाला विकासाच्या दिशेने नेणारा लोकप्रतिनिधीच मिळाला नसल्याची खंत या भागातील नागरिक हताश मनाने व्यक्त करतांना दिसतात. नगर पालिकेच्या विकसित धोरणापासून शहरातील काही भाग पूर्णतः वंचित राहिला आहे. नगर पालिकेच्या विकासकामांच्या यादीत या भागांना कधी स्थानच मिळाले नाही. कोणताही माजी नगर सेवक या भागातील समस्या व प्रश्न उचलून धरताना दिसत नाही. शहरात विकासाची गंगा वाहत असतांना काही भागात मात्र अजूनही विकासकामांचा कोरडा दुष्काळ पडला आहे. या भागांनाही विकासाचा चेहरा लाभेल काय, हा प्रश्न येथील नागरिक विचारू लागले आहे. लोकप्रतिनिधींनी शहरातील काही भाग वाळीत टाकल्याचे दिसत आहे. या भागांमध्ये विकासकामे करायचीच नाही, हा त्यांचा अट्टहास दिसून येत आहे. नगर पालिका विकसित परिसराचा कर येथील नागरिकांकडून वसूल करते. पण या भागात कितपत विकासकामे झाली, यावर मात्र दृष्टिक्षेप टाकतांना दिसत नाही. लोकप्रतिनिधीही या भागातील विकासकामांवर कटाक्ष टाकत नसल्याने हे भाग दुर्लक्षित राहिले आहेत. ग्रामीण भागापेक्षाही दयनीय अवस्था या भागांची झालेली असतांना कुणीच या भागांकडे दयादृष्टी दाखवितांना दिसत नाही.
अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्या आजही सांडपाणी वाहून नेण्याचा भार वाहत आहे. आता त्याही दम तोडू लागल्या आहेत. या नाल्या ठिकठिकाणी फुटल्या असून या नाल्यांची अवस्था अगदीच दयनीय झाली आहे. कधी आठवण आली की साफसफाई करणारे कर्मचारी येतात. आणि थातुरमातुर साफसफाई करून जातात. नंतर कित्येक दिवस ते या भागांकडे फिरकत नाही. अनेक दिवसांपासून साफसफाई न झाल्याने या नाल्या पूर्णतः तुंबल्या आहेत. नाल्यांमध्ये घाणपाणी साचले आहे. या साचलेल्या घाणपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर उभे राहणे कठीण झाले आहे. नाल्यांमधून वाहणारे सांडपाणी परिसरातीलच नागरिकांच्या घराजवळ असलेल्या गटारात साचून राहते. गटारातील घाणपाणी वाहून नेण्याकरिता सिमेंट पाइपही अद्याप टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेल्या या भागांमध्ये डेंग्यू व इतर विषाणूजन्य आजारांची लागण मोठ्या प्रमाणात होतांना दिसते. मूलभूत सोइ सुविधाही पुरविण्याकडे नगर पालिका दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील काही भाग विकापासून कोसो दूर राहिले आहे. लोकप्रतिनिधींची उदासीनताही या भागांचा विकास न होण्याला कारणीभूत ठरली आहे. नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षितपणा या भागातील विकासाला नडला आहे. मात्र तरीही येथील नागरिक विकासकामांची आस लावून बसले आहेत. त्यामुळे कोट्यवधींच्या विकासकामांत या भागांचंही नशीब उजाडेल काय, हे आता येणारा काळच सांगेल. पण ज्या स्थितीत आहे त्या नाल्यांची तरी साफसफाई करण्याची नगर पालिकेने तसदी घ्यावी, ही मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.
Comments
Post a Comment