विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वणी तालुक्याला धूळ प्रदूषणाचे ग्रहण, धूळ प्रदूषणाने जनजीवन झाले प्रभावित
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुका हा कोळसाखाणींनी व्यापलेला आहे. कोळसाखाणीतून सतत कोळशाची वाहतूक सुरु असते. रस्ते व लोह मार्गाने हा कोळसा वीज प्रकल्पांना तथा कोळशावर आधारित उद्योगांना पाठविला जातो. मात्र कोळशाची वाहतूक करतांना किंवा सायडिंगवरून मालवाहू रेल्वेत कोळसा भरतांना वेकोलि कडून कोणत्याही प्रकारच्या दिशा निर्देशांचे पालन करण्यात येत नाही. कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जात कोळसा भरण्यात येतो. त्यामुळे वाहतूक करतांना तो रस्त्यावर पडतो. नंतर त्याची भुकटी तयार होते, व ती रस्त्यावर धूळ बनून उडत असते. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर ताडपत्रीही व्यवस्थित झाकण्यात येत नाही. त्यामुळेही कोळसा ट्रकांमधून खाली पडतो. ताडपत्री व्यवस्थित झाकण्यात येत नसल्याने कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांमधूनही कोळशाची धूळ उडतांना दिसते. कोळसा सायडिंगवरही कुठल्याही नियमांचे पालन करण्यात येत नाही. सायडिंग वरील कोळशाच्या ढिगाऱ्यांवर व सायडिंग परिसरात योग्यरीत्या पाण्याची फवारणी करण्यात येत नसल्याने कोळसा सायडिंगवरून सारखी धूळ उडत असते. ही धूळ वाऱ्याच्या वेगाने आसपासच्या परिसरात परसरते. कोळसा सायडिंग वरून उडणाऱ्या या धुळीमुळे परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत.
वेकोलिच्या वणी रेल्वे सायडिंगचे इन्चार्ज असलेले श्रवण कुमार यांच्या दुर्लक्षितपणामुळे सायडिंग व्यवस्थापन ढेपाळले आहे. कोळसा सायडिंग वरून उडणाऱ्या धुळीने वैतागलेल्या नागरिकांनी व खास करून महिलांनी काही दिवसांपूर्वी भव्य मोर्चा काढला होता. परंतु श्रवण कुमार यांनी धूळ प्रदूषण नियंत्रित ठेवण्याचे आश्वासन देण्याऐवजी मोर्चातील महिलांशीच हुज्जत घातली. कोळसा सायडिंगवर प्रदूषण मापक यंत्र अद्याप बसविण्यात आलेले नाही. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी वेकोलिकडून कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही. धूळ प्रदूषण होणार नाही याची वेकोलि कडून जराही खबरदारी घेतली जात नाही. तसेच कोळसा सायडिंग लोकवस्तीपासून दूर हलविण्याच्या कुठल्याही हालचाली होतांना दिसत नाही. त्यामुळे कोळसा सायडिंग लगत असलेल्या परिसरातील नागरिकांना धूळ प्रदूषणातच जीवन कंठावं लागत आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मुख्य मार्गावर व राहुटी भागात असलेल्या या कोळसा सायडिंग हटविण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप त्या दिशेने कोणत्या हालचाली सुरु झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे कोळशाची धूळ ओकणाऱ्या या दोन्ही कोळसा सायडिंग रहिवाशी वस्त्यांपासून हटविण्याची मागणी धूळ प्रदूषणाने वैतागलेल्या नागरिकांमधून होत आहे.
Comments
Post a Comment