नैराश्येतून आणखी एका इसमाने केला जीवनाचा शेवट, राहत्या घरीच घेतला गळफास
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील इस्लामपुरा (खडबडा मोहल्ला) येथे वास्तव्यास असलेल्या इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १५ मार्चला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मारोती विठ्ठल ठावरी वय अंदाजे ४२ वर्ष असे या गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. पत्नी व मुलगा घराबाहेर गेल्याची संधी साधून त्याने घरातील खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. शहरात नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून एका पाठोपाठ होत असलेल्या आत्महत्यांनी चिंता निर्माण केली आहे. जीवनातील आव्हाने व संकटांचा सामना न करता आत्महत्येचा मार्ग निवडला जात असल्याने चिंता निर्माण झाली आहे.
इस्लामपुरा (खडबडा मोहल्ला) परिसरात परिवारासह राहत असलेल्या मारोती ठावरी यांनी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राहत्या घरीच गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. ते घरीच टेलरिंगचा व्यवसाय करायचे. त्यांना दोन मुले असून एक मुलगा बाहेरगावी तर एक मुलगा त्यांच्या सोबत राहतो. आज सकाळी पत्नी व मुलगा काही वेळासाठी घराबाहेर गेले असता मारोतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना मारोती ठावरी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मारोती ठावरी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरातील कर्त्या पुरुषाने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मारोती ठावरी यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment