सरपंचावरील खोटे गुन्हे मागे घेण्याकरिता अख्ख गावच आलं पोलिस स्टेशनला
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील पेटूर या गावात वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त लावण्यात आलेल्या बॅनर वरून सरपंच व आयोजकांमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रतिबंधित जागेवर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे बॅनर लावण्यात आल्याने सरपंचांनी कार्यक्रम स्थळाचे फोटो काढून पोलिसांना पाठविले. यावरून सरपंच व आयोजकांमध्ये झालेल्या वादातून आयोजकांनी सरपंचावर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. सरपंचाविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आल्याचे कळताच गावकरी मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनला धडकले. त्यांनी सरपंचावरिल खोटे गुन्हे त्वरित मागे घेऊन गावातील शांतता भंग करण्याकरिता समाजबांधवांची माथी भडकविणाऱ्या मास्टरमाईंवर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषद वणीच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या प्रकरणी आयोजक महिलेने सरपंचांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे बॅनर फाडून महिलांना जातीवाचक तथा अश्लील शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची व अंगवस्त्र फाडल्याची तक्रार केली होती. यावरून गावात रान पेटले व सरपंचाच्या पाठीशी संपूर्ण गाव उभा राहिला.
पेटूर या गावात आदिवासी समाजबांधवांनी उभारलेल्या झेंड्याचा वाद मिटल्यानंतर वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त प्रतिबंधित जागेवर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे परत वाद उफाळून आला. गावात वीर बाबुराव शेडमाके यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. त्यांच्या जयंती निमित्त गावातून रॅली देखील काढण्यात आली. या कार्यक्रमावेळी गावात दोन पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. वीर बाबुरव शेडमाके यांच्या जयंती निमित्त रात्री ग्रामपंचायतीने प्रतिबंधित केलेल्या जागेवर शुभेच्छा बॅनर लावण्यात आले. पोलिसांशी हुज्जत घालून आयोजकांनी बॅनर लावल्याने पोलिस तेथून निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी सरपंच प्रविण झाडे यांना बॅनर व कार्यक्रम स्थळाचे फोटो काढून पाठविण्यास सांगितले. सरपंच हे तेथे जाऊन बॅनर व कार्यक्रम स्थळाचे फोटो काढत असतांना आयोजकांनी त्यांच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर आयोजकांनी पोलिस स्टेशनला सरपंचांवर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल कण्याबाबत तक्रार केली. सरपंचाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आल्याने गावकरी चांगलेच संतापले. काल १५ मार्चला दुपारी २ वाजताच्या सुमारास असंख्य गावकऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठून सरपंचाविरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तसेच गावातील सामाजिक सलोखा बिघडविण्याकरिता समाजबांधवांची माथी भडकविणाऱ्या वांजरी येथील व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची देखील गावकऱ्यांनी मागणी केली. या संदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांना प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
या प्रकरणात महिलेने दिलेल्या तक्रारी वरून वीर बाबुराव शेडमाके जयंती निमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडून सरपंचांनी आयोजक महिलांना अश्लील शिवीगाळ केली. गावातीलच महिलेने पोलिस स्टेशनला ही तक्रार दिली. गावचे सरपंच असलेले प्रविण झाडे यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे बॅनर फाडले. जयंतीचे बॅनर फाडल्याचे कळताच महिलांनी सरपंचांना गाठले. जयंतीचे बॅनर का फाडले अशी सरपंच प्रविण झाडे यांना विचारणा केली असता त्यांनी महिलांनाच जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ करणे सुरु केले. एवढेच नाही तर त्यांनी धक्काबुक्की करून अंगवस्त्र फाडल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेने याप्रकरणी विनयभंग व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची तक्रारीतून मागणी केली. आयोजक महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्याचे कळताच गावकरी चांगलेच संतापले. त्यांनी सरपंचाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पोलिस स्टेशनकडे आपला मोर्चा वळविला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून पोलिस विभागाला निवेदन देऊन सरपंचावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तसेच समाजबांधवांना चिथवणाऱ्या मास्टरमाईंड व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment