लोकसभेची उमेदवारी मिळावी हा माझा आग्रहच नव्हता, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी साधला संवाद
प्रशांत चंदनखेडे वणी
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी चौफेर चर्चा केली. भाजपचा अजेंडा हा देशाच्या विकासाचा असल्याचे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना म्हटले. विरोधकांवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. विरोधकांनी ५० वर्षात देशाचा किती विकास केला आणि आम्ही १० वर्षात देशाच्या विकासाचा स्थर कुठवर नेला, याची साक्ष स्वतः देशवासीच देतील, हे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही विकसित भारताचा संकल्प केला आहे. जनतेच्या कल्याणाकरिता विविध शासकीय योजना राबविल्या आहेत. भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांचा अनेकांना लाभही मिळाला आहे. भारतीय जनता पार्टीत आजही समन्वय असून गटातटांना येथे थारा नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यकर्ते कुण्या एका व्यक्तीचे नसतात. तर ते पक्षाचे असतात. मी कधीही कुठली खाती द्यावी म्हणून आग्रही भूमिका घेतली नाही. पक्षाने मला ती बहाल केली. पदं मिळतात आणि जातातही पण आपण केलेली कामे निरंतर जनतेच्या स्मरणात राहतात. त्यामुळे मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करणं गरजेचं असते.
देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्याने अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. ज्या विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आहेत, त्या क्षेत्राच्या विकासाकरिता त्यांनी दिलेले आश्वासन पक्षाने पूर्ण केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आश्वासन देत नाही तर ते पूर्ण देखील करते, यांचा प्रत्यय देखील जनतेला आला आहे. नंदीग्राम एक्सप्रेस वरून प्रश्न उठल्यानंतर त्यांनी नंदीग्राम एक्सप्रेसला झंडी दाखविणारे हात माझे नव्हतेच हा खुलासा देखील पत्रकार परिषदेतून केला. नंदीग्राम एक्सप्रेसचा मार्ग बल्लारशाहकडे वळविण्यात आला, त्या सोहळ्याचा मी साक्षीदारच नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पण नंदीग्राम एक्सप्रेसला पूर्ववत त्याच मार्गाने सुरु करण्यास आपण कटिबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली. तसेच आणखीही काही एक्सप्रेस या मार्गाने सुरु करता येईल काय, यावरही मंथन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. पत्रकार परिषदेला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपचे लोकसभा समन्वयक रवि बेलुरकर, माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांच्यासह भाजपचे लोकसभा व विभासभा क्षेत्रातील नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीने भाकरी फिरविल्याने पक्षातील काही नेत्यांचे पोट दुखत असल्याची जोरदार चर्चा सुरु असून एक गट नाराज असल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी चंद्राला ग्रहण लावण्यास कारणीभूत ठरू नये, अशी ही जोरदार चर्चा या मतदार संघात रंगली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून सलग तीन वेळा विजयाची माळ गळ्यात घालणारे भैय्या एका निसटत्या परावभावने उमेदवारी पासून बेदखल झाले आहेत. अंतर्गत वाटाघाटीत त्यांच्या वाट्याला निराशा आली आहे. त्यांचे उमेदवारी पदरात पाडून घेण्याचे स्वप्न भंगले आहे. केवळ ४४ हजार ७०० मतांनी त्यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातूनच ते मतांनी माघारले होते. याला योगायोग म्हणावं की, योग्य जुळवून आणला गेला म्हणावं, हा आता चर्चेचा विषय बनला आहे.
भैय्याचा या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रावर मोठा प्रभाव राहिला आहे. भैय्याला मानणारा कार्यकर्ता वर्गही मोठा आहे. त्यामुळे या राजहंसावर विजयाची घोडदौड अवलंबून राहणार असल्याची खुली चर्चा या मतदार संघातून ऐकायला मिळत आहे. दुसरीकडे विरोधकांच्याही कडव्या आव्हानाला सुधीर मुनगंटीवार यांना सामोरे जावे लागणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार किंवा त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार अथवा आमदार प्रतिभा धानोरकर हे महाविकास आघाडी कडून तिकीट मिळण्याचे प्रमुख दावेदार आहेत. पण काटशहकटाच्या राजकारणातून पुढे येत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी कोण लढत देईल, हे लवकरच समोर येणार आहे. त्यामुळे कुणासाठीही विजयाचा मार्ग सरळ व सोपा राहणार नाही. असे असले तरी शेवटी मतदारांचा कौल महत्वाचा ठरणार आहे. मतदार राजा कुणाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवितो, हे आता येणारा काळच ठरवेल.
३३ कोटी रुक्ष लागवडीचा आधी खुलासा करावा, ऍड. दिलीप परचाके
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वणी येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळातूनही आता रोचक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ऍड. दिलीप परचाके यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी आधी ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीचा खुलासा करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ३३ कोटी वृक्ष कुठे लावले, त्यांचं संवर्धन झालं काय, त्यातील किती वृक्ष जगलेत आणि किती खड्ड्यात मुरलेत याचा आधी लेखाजोगा द्यावा. आणि त्यानंतरच निवडणुकीला सामोरे जावे. ३३ कोटी वृक्ष लागवडीचं पाणी नेमकं कुठे मुरलं, ३३ कोटी रुक्ष की केवळ ३३ कोटी ही संभ्रमावस्था आधी दूर करावी. ३३ कोटी वृक्षांची लागवड पर्यावरणाचा समतोल व नैसर्गिक वातावरण निर्मितीसाठी करण्यात येणार असल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. पण वृक्ष लागवडीच्या धोरणातून कुणाचा समतोल राखल्या गेला हे कोडं अद्याप सुटलेलं नाही. त्यामुळे सरकारच्या तिजोरीतून ३३ कोटी रुक्ष लागवडीवर करण्यात आलेल्या खर्चातून काय साध्य झालं, व लागवड केलेल्या किती रोपट्यांचे वृक्ष झाले हे वनमंत्र्यांनी आधी जनतेला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे वनमंत्री म्हणून त्यांनी वृक्ष लागवडीचं अमलात आणलेलं धोरण कितपत यशस्वी झालं, याचं आधी स्पष्टीकरण द्यावं आणि नंतरच प्रचाराचा नारळ फोडावा, ही त्यांच्या वृक्ष लागवडीच्या धोरणाचा वेध घेणारी प्रतिक्रिया ऍड. दिलीप परचाके यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment