राजूर (ई) येथील जुगारावर पोलिसांची धाड, चार जुगाऱ्यांना अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील राजूर (ई) येथे सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून ४ जुगाऱ्यांना अटक केली. ही कार्यवाही होळीच्या पूर्वसंध्येला (२३ मार्च साय.५.४५ वाजता) करण्यात आली. पोलिसांना पाहून काही जण मात्र पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना हुलकावणी देऊन ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. राजूर येथे मोठ्या प्रमाणात जुगार भरवला जात असून मटका अड्डेही राजरोसपणे सुरु आहेत. त्यामुळे राजूर येथील रोजंदारीने कामे करणारा व काबाडकष्ट करून जीवन जगणारा मजूरवर्ग मटका जुगाराच्या आहारी गेल्याने त्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. मिळकतीचे पैसे मटका जुगार खेळण्यात घालविले जात असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. राजूर येथे अवैध धंद्यांना उधाण आले असून अवैध दारू विक्री, मटका व जुगार जोमात सुरु आहे. राजूर येथे ठिकठिकाणी मटका अड्डे चालविले जात असतांना कार्यवाही मात्र नाममात्र होतांना दिसते. काही दिवसांपूर्वी राजूर येथील मटका अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकली होती. परंतु मटका अड्डा चालविणाराच पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यामुळे त्याला फरार दाखविण्यात आले. पण तो फरारीत असतांनाही मटका अड्डा मात्र नियमित सुरु होता.
राजूर (ई) येथील पाण्याच्या टाकीमागे सार्वजनिक ठिकाणी गंजी पत्त्यावर जुगार रंगला असल्याची विश्वसनीय माहिती एपीआय दत्ता पेंडकर यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकाला घेऊन तात्काळ जुगार सुरु असलेला परिसर गाठला. त्या ठिकाणी गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जुगार खेळणाऱ्या लोकांचा मोठा घोळकाच त्यांना त्याठिकाणी आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्या ठिकाणी धाड टाकली. मात्र तरीही काही जुगाऱ्यांना पोलिसांचा सुगावा लागला, व पोलिसांना पाहून ते सैरावैरा पळत सुटले. परंतु चार जुगारी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर मजुकाच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी ३९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये गोपाल नारायण दासारी (४०) रा. राजूर (कॉ), शुभम हरिदास राजूरकर (२५), संदीप काशिनाथ मिलमिले (३४), विनीत किशन कांबळे (१९) तिघेही रा, राजूर (ई) यांचा समावेश आहे. घटनेचा पुढील तपास एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे.
Comments
Post a Comment