प्रशांत चंदनखेडे वणी
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणुकीच्या धुमाळीने राजकारण तापलं असून राजकीय हालचाली व घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पुढारी निवडणुकीचे डावपेच आखण्यात व्यस्त झाले असून उमेदवार निवडणूक अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत. २७ मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज जिल्हा कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्याची लगबग पाहायला मिळाली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून आज जवळपास ६४ उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर -वणी-आर्णी मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असून दोन तगड्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून दीर्घ चर्चेनंतर व राजकीय तडजोडीनंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महायुती आघाडीचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी त्यांची काट्याची टक्कर होणार असल्याचे संकेत मिळत आहे. या दोन बलाढ्य उमेद्वारांमुळे निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. चंद्रपूर हा ओबीसी बहुल मतदार संघ असल्याने जातीय समीकरणांमुळे विजयाची दिशा बदलण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जातीय समीकरणाच्या कसोटीतून उमेदवारांना जावं लागणार आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने सहानुभूतीच्या लाटेत प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाची वाट सुकर होते, की धीर धरून असलेले सुधीर मुनगंटीवार मतदारांची मने वळविण्यात यशस्वी होतात, हे आता येणारा काळच सांगेल.
विद्यमान आमदार व विद्यमान वनमंत्री यांना लोकसभा उमेदवारीची लॉटरी लागल्याने दोघेही आपापल्या विजयाची दावेदारी सांगत आहेत. प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची सीट मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार हे देखील इच्छुक होते. त्यामुळे महाविकास आघाडी समोर तिकीट कुणाला द्यायचे हा पेच निर्माण झाला होता. तसेच दोनही नेत्यांच्या समर्थकांमध्ये पत्र युद्ध रंगल्याने उमेदवारीसाठीचा कलह चव्हाट्यावर येऊ लागला होता. शेवटी विजय वडेट्टीवार यांनी माघार घेत प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे काल त्यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच दिल्लीत तळ ठोकून बसलेल्या प्रतिभा धानोरकर यांचं नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर त्या आपल्या मतदार संघाकडे येण्यास निघाल्या. त्यावेळी त्यांच्या सोबत समर्थकांचाही मोठा ताफा होता. दरम्यान त्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा खांबाडा गावाजवळ अपघात झाला. वाहनातील कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. नाहीतर निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असतं. अपघात घडताच प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांची चौकशी करून त्यांना दुसऱ्या वाहनातून पाठविले, व त्या चंद्रपूरकडे रवाना झाल्या.चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून या क्षेत्रातील १८ लाख ३६ हजार ३१४ मतदार उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरविणार आहे. कोणत्या उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडायचं हे सर्वस्वी मतदारांवर अवलंबून राहणार आहे. मतदार आता जागृत झाले असून कुठल्याही भूलथापांना ते बळी पडणार नसल्याचे त्यांच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहे. लोकसभा क्षेत्राचा विकास हा या निवडणुकीचा कळीचा मुद्दा राहणार आहे. शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधांचा स्थर उंचाविण्याकरिता कोणते प्रयत्न झाले व बेरोजगारी निर्मूलनाकरिता लोकप्रतिनिधींनी काय भूमिका घेतली, हा मुद्दाही निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. मुबलक खनिज निधी मिळत असतांनाही वणी विधानसभा क्षेत्राला दुय्यम वागणूक मिळाली. उच्च शिक्षणाच्या कुठल्याही सुविधा याठिकाणी उपलब्ध नाही. ग्रामीण रुग्णालयाला अद्याप उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाला नाही. उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याच्या नुसत्या बोंबा मारण्यात आल्या. पण अद्याप ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले नाही. रुग्णांना रेफर करण्याशिवाय कुठलाच उपचाराचा मार्ग याठिकाणी उपलब्ध नाही. साप चावला तरी रुग्णांना येथून रेफर केलं जातं.
वणी तालुक्यात कुठल्याही प्रकारचा औद्योगिक विकास झाला नाही. तालुक्यात एकही मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. शेकडो युवकांना रोजगार मिळेल असा कोणताच औद्योगिक प्रकल्प या ठिकाणी सुरु करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. इंदिरा सूतगिरणीला पूर्णत्वास नेण्याचा अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. इंदिरा सूतगिरणीचं भिजत घोंगडं असून खाजगी सूतगिरणी मात्र पूर्णत्वास आली आहे. परंतु या सूतगिरणीत निव्वळ मजुरांचं शोषण केलं जात आहे. इंदिरा सूतगिरणी सुरु झाली असती तर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळाले असते. परंतु रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास कुणीच पुढाकार घेतांना दिसत नाही. जिल्हा वेगळा व लोकसभा क्षेत्र वेगळं असल्याने वणी तालुक्याला नेहमी सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे.
वणी तालुका हा शिक्षण, आरोग्य व औद्योगिक प्रगतीत आजही मागासला आहे. त्यामुळे वणी तालुक्यात या मुद्द्यांवर मतदारांचा कौल राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही कोरोना काळापासून बंद आहे. देशातील अनेक शहरे रेल्वे मार्गाला जोडली जात आहे. पण अनेक वर्षांपासून रेल्वे मार्गाने जोडलेल्या या तालुक्याला दैनंदिन प्रवासी रेल्वे पासून वंचित ठेवण्यात आलं. आजही नागपूरला जातांना प्रवाशांना दामदुप्पट किंमत मोजावी लागते. पण नागपूरच्या प्रवासाकरिता अद्याप दैनंदिन रेल्वे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. नंदिग्रामला कोरोना झाला आणि तीला तिकडेच कायमचे कोरंटाईन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचा २००९ साली चंद्रपूर लोकसभेत समावेश करण्यात आला. परंतु हा तालुका विकासाच्या दृष्टीने नेहमीच दुर्लक्षित राहिला. त्यामुळे विकासाची संकल्पना मांडतांना उमेदवारांचा मोठा कस लागणार आहे.
No comments: