राजूर (कॉ.) येथे विहिरीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली, गावातीलच व्यक्तीचा मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथिल एका पडक्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना काल २५ मार्चला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. काल उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. परंतु आज या मृतदेहाची ओळख पटली असून मृतक हा राजूर (कॉ.) येथीलच रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नामदेव पोचम्मा शेनुरवार (५०) रा. वार्ड क्रमांक २ राजूर (कॉ.) असे या मृतक व्यक्तीचे नाव आहे. तो मागील सहा ते सात दिवसांपासून घरून बेपत्ता असल्याचे मृतकाच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. तो नातेवाईकांकडे गेला असावा असा अंदाज बांधून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला नाही. दरम्यान धुळीवंदनाच्या दिवशी कोळसा सायडिंग जवळ मस्जिद परिसरात असलेल्या एका पडक्या विहिरीत त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला. त्याने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत निरनिराळे निष्कर्ष लावण्यात येत असले तरी पोलिसांकडून मात्र घातपाताच्या शंकेला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य परिस्थिती समोर येणार असल्याचे एपीआय दत्ता पेंडकर यांनी सांगितले आहे.
नामदेव हा मिळेल ते मजुरीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढण्यावर तो ठाम राहायचा. परिस्थिती समोर लोटांगण घालणाऱ्यांपैकी तो नव्हताच असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे तो आत्महत्या करू शकतो यावर विश्वासच बसत नसल्याचेही त्याच्या आप्तस्वकियांनी म्हटले आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांच्या उपयोगात नसलेल्या विहरीत त्याचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहावरून वर्तविण्यात येत होता. पडक्या विहरीत महादेव हा मृतावस्थेत आढळल्याने गावात वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटले आहे. मृतक नामदेव याच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याकरिता पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. आज मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरीता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेचा पुढील तपास एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे.
No comments: