उभ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा आज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेश नरसिंग पुण्यानी (53) रा. जैन स्थानक जवळ वणी असे या अपघाती मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मल्टीस्टेट सोसायटी व पतसंस्थांचे दैनंदिन बचत अभिकर्ते म्हणून निधी गोळा करण्याचे काम करायचे. काल 28 मार्चला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील मंगरूळ गावाजवळ त्यांचा अपघात झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
शहरातील विविध पतसंस्था व मल्टीस्टेट सोसायटीचे दैनंदिन बचत अभिकर्ता म्हणून ते वणी पासून तर मारेगाव पर्यंत निधी गोळा करण्याचे काम करायचे. राजूर येथील कलेक्शन करून ते मारेगाव कडे जात असताना त्यांना मोबाईल कॉल आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली, व मोबाईलवर बोलत असतांनाच वणी कडून मारेगावकडे भरधाव जात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ते दूरवर फेकल्या गेले. यात त्यांना जबर मार लागल्याने आधी वणी येथील रुग्णालयात तर नंतर लगेच त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. परंतु नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घरातील कर्ता पुरुष अचानक सर्वांना सोडून गेल्याने अख्ख कुटुंबच दुःख सागरात बुडालं आहे. राजेश पुण्यानी हे सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्याशी अनेक जण जुळले होते. त्यांचा मित्र परिवराही मोठा होता. त्यांच्या स्वभावगुनामुळे त्यांच्याशी अनेकांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या अशा या अकाली जाण्याने मित्र परिवार व आप्तस्वकीयांमधून हळहळ व्यक्त होत आहे. राजेश पुण्यानी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊबंद असा मोठा आप्त परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: