संसारिक जीवनाला जेमतेम सुरुवात झाली आणि तिने घेतला गळफास
वणी तालुक्यातील पळसोनी येथील एका विवाहित युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल 27 मार्चला दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रणिता शंकर भट (२५) असे या गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. पती कामावर गेल्यानंतर तिने मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून एका पाठोपाठ एक आत्महत्या होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संपुदेशन करणे नितांत गरजेचे झाले आहे.
पळसोनी येथे पतीसोबत राहत असलेल्या युवतीने घराच्या लोखंडी आड्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. पती वणी येथे कामावर गेल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान शंकरची आई त्याच्या घराकडे आली असता त्यांना प्रणिता ही घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. महिलेच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तिने आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्नीने गळफास घेतल्याचे शंकरला कळताच तो तत्काळ घरी पोहोचला. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्रणिता हिच्या लग्नाला जेमतेम अडिच वर्ष झाले होते. अडीच वर्षाच्या संसारात तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment