कोळसा डेपो मधील हजारो टन कोळसा झाला जळून राख, आगीची धग मात्र अजूनही कायम
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया येथील एका कोळसा व्यावसायिकाच्या कोळशाच्या साठ्याला (कोलडेपो) आग लागून आगीत हजारो टन कोळसा जळून खाक झाला आहे. कोळशाला लागलेली आग अद्यापही शमली नसून आग विझविण्यात दिरंगाई होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आग विझविण्याचे काम अतिशय कासवगतीने सुरु असून कोळशाच्या ढिगाऱ्यातुन अजूनही आगीच्या ज्वाळा निघत असल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. धुळीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी एफसीआय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कोलडेपोला आग लागली. कोलडेपो मधील कोळशाचा संपूर्ण साठाच आगीच्या भक्षस्थानी चढला. एवढेच नाही तर एक लोडर मशिनही आगीत जळाल्याचे सांगण्यात येत आहे. कोळशाच्या साठ्याला आग लागून सहा ते सात दिवस लोटले तरी आग पूर्णतः विझविण्यात आली नाही. कोलडेपो मालक आग विझविण्याची तसदी घ्यायला तयार नाही. त्यामुळे ही आग आता संशयाच्या घेऱ्यात आली आहे.
एफसीआय (फ्युल कॉर्पोरेशन इंडिया लि.) या कोलडेपोला धुळीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी अचानक आग लागली. कोलडेपोमध्ये साठवून असलेला अंदाजे १० हजार टन कोळसा आगीच्या भक्षस्थानी चढला. आगीत एक लोडर मशिनही जाळून खाक झाली. आग लागताच टिप्परच्या साहाय्याने कोळसा दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने कोळसा उचलणे शक्य झाले नाही. त्यानंतर तीन ते चार दिवस आग धुमसत राहिली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कुठलेच ठोस प्रयत्न कोलडेपो धारकाकडून करण्यात आले नाही. त्यामुळे या आगीने रहस्यमय वातावरण निर्माण केले आहे. आग विझविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष विविध चर्चांना जागा मोकळी करून देत आहे. आगीची धग अद्यापही कायम असून जळत्या निखाऱ्यातून अजूनही आगीच्या ज्वाळा निघत आहेत. उष्णतामान वाढल्यानंतर कोळशाला आग लागू नये याची पूर्णतः खबरदारी घेतली जाते. पण हजारो टन कोळसा आगीत भस्मसात होई पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न होऊ नये, यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयांचा कोळसा आगीत जळून खाक झाला. पण आग पूर्णपणे विझविण्यात मात्र अद्याप यश आले नाही.
लालपुलिया परिसरात जुगल किशोर अग्रवाल यांच्या मालकीचा एफसीआय हा मोठा कोलडेपो आहे. कोळसाखाणींतून खाजगी डिओ घेऊन खरेदी करण्यात आलेला कोळसा कोलडेपोमध्ये साठविण्यात येतो. नंतर तो कोळसा चिल्लर व ठोक विक्रेत्यांना तसेच कोळसा उद्योगांना विक्री करण्यात येतो. एफसीआय कोलडेपोमध्येही याच उद्देशाने साठवून ठेवण्यात आलेल्या कोळशाला अचानक आग लागली. आणि हजारो टन कोळसा आगीत जळून राख झाला. कोळशाची राख झाली तरी आग मात्र विझविण्यात आली नाही. तीन ते चार दिवस आग तशीच धुमसत राहिली. अजूनही आगीची धग कायम असून आग विझविण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतांना दिसत आहे. त्यामुळे कोळशाला लागलेल्या आगीने संशयास्पद स्थिती निर्माण केली आहे. लालपुलिया परिसरातील इतर कोळसा व्यावसायिकही आता संभ्रमात पडले असून 'ये आग कब बुझेगी' असे प्रश्न ते विचारू लागले आहेत.
Comments
Post a Comment