शाळेतुन बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा पोलिसांनी शीघ्र लावला शोध, दोन आरोपींना केले गजाआड
प्रशांत चंदनखेडे वणी
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील दोन अल्पवयीन मुली तेथीलच एका शाळेतील विद्यार्थिनी असून त्या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. ३० एप्रिलला त्या दोघीही सोबतच शाळेत गेल्या होत्या. शाळेच्या मधल्या सुट्टीत त्या दोघी फेरफटका मारण्याच्या बहाण्याने शाळेबाहेर पडल्या, त्या शाळेत परतल्याच नाही. एका अल्पवयीन मुलीची मोठी बहीण देखील त्याच शाळेत शिकायला आहे. तिलाच सांगून त्या दोघी शाळेबाहेर गेल्या होत्या. परंतु शाळा सुटण्याची वेळ होऊनही त्या दोघी शाळेत न परतल्याने मुलीच्या मोठ्या बहिणीने ही माहिती आपल्या पालकांना दिली. दोनही मुलींच्या पालकांनी मुलींचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर १ एप्रिलला मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. मुलींना कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचाही संशय त्यांनी तक्रारीतून व्यक्त केला. शाळेतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येताच शिरपूर पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच दोनही मुलींचा शोध लावला. राजुरा येथे या मुलींना पळवून नेण्यात आल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ राजुरा येथे जाऊन या दोनही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. तसेच त्यांना फूस लावून पळवून नेणाऱ्या दोनही आरोपींना अटक करून शिरपूर पोलिस स्टेशनला आणले. राहुल मारोती मडावी (२४) व निखिल सिडाम (२३) दोघेही रा. खैरगाव ता. कोरपना जि. चंद्रपूर असे या शिरपूर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भादंविच्या कलम ३६३, ३७६(३), ३७६(५) व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment